विजय मल्ल्यांची होणार आर्थर रोड कारागृहात रवानगी, कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 12:45 PM2017-08-14T12:45:21+5:302017-08-14T12:50:24+5:30

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले कर्जबुडवे विजय मल्ल्या यांना भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे

Vijay Mallya will be sent to Arthur Road Jail, Kasab has been kept in Barak arrangement | विजय मल्ल्यांची होणार आर्थर रोड कारागृहात रवानगी, कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये व्यवस्था

विजय मल्ल्यांची होणार आर्थर रोड कारागृहात रवानगी, कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये व्यवस्था

Next
ठळक मुद्देमल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले 9000 कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहेआर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली आहेविजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे

मुंबई, दि. 14 - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले कर्जबुडवे विजय मल्ल्या यांना भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी मिळून मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले 9000 कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहे.

विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. 

केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, आर्थर रोड कारागृहात मल्ल्या यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. 'कारागृह प्रशासनाने रिपोर्ट तयार केला असून त्यानंतर केंद्र सरकारच्या हवाली करण्यात आला. सीबीआयच्या हस्ते हा रिपोर्ट वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टात, जिथे माल्ल्यांच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे, हा रिपोर्ट सादर करण्यात आला', अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या रिपोर्टमध्ये कारागृहातील सुविधा आणि सुरक्षेची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सुनावणी लवकर पुर्ण होत, प्रत्यार्पणाच्या कारवाईला जलदगतीने सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे 2500 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. 

जुलै महिन्यात सक्तवसुली संचलनालयाच्या संयुक्त पथक आणि सीबीआयने लंडन कोर्टात मल्ल्यांविरोधातील महत्वाचे पुरावे सादर केले होते. यामध्ये जून महिन्यात ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटचाही उल्लेख होता. मल्यांचा असलेला मुख्य सहभाग यावेळी पुराव्यांसहित न्यायालयासमोर ठेवण्यात आला. 

विजय मल्ल्या भारतामध्ये येणे कठीण
आरोपीचे ज्या कारणासाठी प्रत्यार्पण करायचे आहे तो दोन्ही देशांच्या कायद्यानुसार फौजदारी गुन्हा असायला हवा, अशी भारत व ब्रिटन यांच्यातील करारात अट आहे. म्हणजेच बँकांचे कर्ज बुडविणे हा भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही गुन्हा आहे, असे भारत दाखवू शकला तरच मल्ल्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकेल. ब्रिटनमध्ये बँकांचे कर्ज बुडविणे हा फौजदारी गुन्हा नाही तर तो एक दिवाणी स्वरूपाचा प्रमाद आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात अडचण येऊ शकते का, या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी उभय देशांमधील प्रत्यार्पण करारात अट असल्याचे कबुल केले होते

मल्ल्यांचं पलायन - 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..

Web Title: Vijay Mallya will be sent to Arthur Road Jail, Kasab has been kept in Barak arrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.