म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 12:52 PM2017-08-15T12:52:21+5:302017-08-15T12:53:56+5:30
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखीमपुर खीरी, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखीमपुर खीरी जिल्ह्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या चौधीपूर गावात अजूनपर्यंत विकास झालेला नाही. गावात विज नाहीये तर रस्त्यांची स्थिती देखील अत्यंत वाईट आहे. अर्ध्याहून अधिक घरांमध्ये शौचालय नसल्याने गावक-यांना अजूनही उघड्यावर शौचास जावं लागतं. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे. त्यामुळे उपजिवेकेसाठी येथील लोक जंगलावर किंवा रोजंदारीच्या कामावर अवलंबून राहावं लागतं. येथे जवळपास 80 कुटुंब राहतात पण केवळ चार शौचालयं आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये विजेची सोय आहे, पण चौधीपूर गावात अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी गुलाब सिंह म्हणाले. जर कोणा अधिका-याने आम्हाला विचारलं की तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा का करत नाही तर मी त्यांना आमच्या गावात बोलवेन आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय हे त्यांना दाखवेन, असं गावातील आणखी एक रहिवासी राम स्वरूप म्हणाले.