पोलीस चकमकीत मला ठार मारण्याचा कट, विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांचा खळबळजनक आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:40 AM2018-01-17T02:40:23+5:302018-01-17T02:40:37+5:30
काही काळासाठी सोमवारी ‘बेपत्ता’ झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली.
अहमदाबाद : काही काळासाठी सोमवारी ‘बेपत्ता’ झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांंनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतकºयांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर आपण राजस्थानच्या न्यायालयात हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनाक्रमाबाबत अतिशय भावनिक होत बोलताना तोगडिया (६२) म्हणाले की, सोमवारी सकाळी मी पूजा करीत असताना मला एक निरोप मिळाला की, गुजरात पोलिसांसह राजस्थान पोलिसांचे एक पथक चकमकीत तुम्हाला मारण्यासाठी येत आहे. त्यानंतर मी विहिंपच्या एका कार्यकर्त्यासोबत आॅटोमध्ये शहरातील थलतेज भागात गेलो. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना मी फोन केला; पण पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी येत असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. त्यामुळे अधिकच संशय निर्माण झाला. त्यानंतर मी माझा मोबाईल बंद केला. त्यानंतर मी एका विमानाने जयपूरला जाण्याचा आणि न्यायालयासमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. मी आॅटोरिक्षातून विमानतळावर जात असताना अचानक मला चक्कर आली आणि मी चालकाला सांगितले की, एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यानंतर मी बेशुद्ध झालो. (वृत्तसंस्था)
योग्यवेळी नावे जाहीर करू
प्रवीण तोगडिया म्हणाले की, हिंदूंसाठी मी आवाज उठवत आलो आहे. राममंदिर, गोरक्षेसाठी राष्ट्रीय कायदा, काश्मिरातील हिंदूंचे पुनर्वसन, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, या मागण्यांसाठी आवाज उठवत आहे; मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.जे लोक यामागे आहेत त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करील, असेही त्यांनी सांगितले. राजस्थान पोलीस मला अटक करण्यास आले होते; पण तेथील मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. गुजरातच्या न्यायालयाने माझ्याविरुद्ध वॉरंट जारी केले तेव्हाही मुख्यमंत्री विजय रूपानी यांना माहीत नव्हते. ज्या लोकांच्या आदेशावर पोलीस माझ्याविरुद्ध कारवाई करीत आहेत त्यांची नावे पुराव्यानिशी सादर करू, असेही ते म्हणाले. विहिंपशी संबंधित डॉक्टरांना सीबीआय धमकावीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.