धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:12 AM2024-05-06T06:12:25+5:302024-05-06T06:12:59+5:30

प्रचारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 

Voting tomorrow for third phase; Allegation and counter-accusation was the battle | धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम

धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभेच्या ११ मतदारसंघांत रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 

राज्यातील निवडणुकीच्या  प्रचाराच्या निमित्ताने महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला. 

प्रचारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 

रोहित पवार यांचे डोळे पाणावले
बारामती : सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत आमदार रोहित पवार भावुक झाले व त्यांचे डोळे पाणावले. जेव्हा पक्ष फुटला त्यावेळी नवीन पिढी जबाबदारी घेईपर्यंत माझे डोळे मिटणार नाहीत, हे साहेबांचे शब्द होते, हे सांगताना रोहित गहिवरले.

अन् अजित पवारांनी केली नक्कल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांची रडतानाची मिमिक्री केली. ते म्हणाले, आमच्या पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो.

कोणत्या राज्यांत किती जागांवर मतदान? 
आसाम (४), बिहार (५), छत्तीसगड (७), गोवा (२), गुजरात (२६), कर्नाटक (१४), मध्य प्रदेश (८), महाराष्ट्र (११), उत्तर प्रदेश (१०),  पश्चिम बंगाल (४), दादरा-नगर हवेली / दीव-दमण (२) आणि जम्मू-काश्मीर (१) मध्ये मतदान आहे.

रायगडमध्ये महायुती-मविआत थेट लढत
रायगड लोकसभा मतदारसंघात गेले दीड महिने सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली  आहे. ७ मे रोजी मतदान होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत आहे.

Web Title: Voting tomorrow for third phase; Allegation and counter-accusation was the battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.