"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:43 PM2024-05-07T17:43:47+5:302024-05-07T17:46:47+5:30
Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राम मंदिराचा निर्णय बदलणार असल्याचे संजय जयस्वाल म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस शतकानुशतके हिंदू धर्म, ब्राह्मण आणि हिंदू देवतांचा अपमान करत आहे. आपल्या व्होट बँकेच्या राजकारणाला बळ देण्यासाठी काँग्रेसला आता राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे, असे भाजपाचे नेते आणि एनडीएचे उमेदवार डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले. ते चनपाटिया आणि नौतानमध्ये जनसंपर्क दौऱ्यावेळी बोलत होते.
शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राम मंदिराचा निर्णय बदलणार असल्याचे संजय जयस्वाल म्हणाले. तसेच, काँग्रेसला सनातन आणि प्रभू श्रीरामाची इतकी अडचण आहे की, त्यांनी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, असे संजय जयस्वाल यांनी सांगितले.
याचबरोबर, प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर राममंदिराला भेट देणाऱ्या किंवा समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा इतका अपमान झाला की, त्यांना पक्ष सोडावा लागला. सनातनवर बोलणारा काँग्रेसमध्ये राहणार नाही, हे यावरून सिद्ध होते, असे संजय जयस्वाल म्हणाले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपेंद्र सराफ, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनरंजन कुमार आदी उपस्थित होते.
राम मंदिराबाबतचा निर्णय बदलण्याचा आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही केला होता दावा
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य काल केले होते. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते की, "मी 32 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. जेव्हा राम मंदिराचा निर्णय आला, तेव्हा राहुल गांधींनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत, ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक महासत्ता आयोगाची स्थपना करणार आणि राम मंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता."