'आता हिंदूंना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापासूनही रोखणार का ?', फटाकेबंदीवर संतापले त्रिपुराचे राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 09:29 AM2017-10-11T09:29:18+5:302017-10-11T09:30:44+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय दिल्यानंतर एकीकडे निर्णयाचं समर्थन होत असताना विरोधही वाढू लागला आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय दिल्यानंतर एकीकडे निर्णयाचं समर्थन होत असताना विरोधही वाढू लागला आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून तथागत रॉय यांनी आपली नाराजी व्यक्त करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीचा दिलेला निर्णय गतवर्षी असहिष्णूता वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत करणा-या कलाकार आणि लेखकांपासून प्रभावित झाल्याचंही तथागत रॉय बोलले आहेत.
ट्विटरवरुन तथागत रॉय यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'कधी दहीहंडी, आज फटाके, उद्या कदाचित प्रदूषणाचा दाखला देत मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता जाळण्याविरोधात याचिका करेल', असं ट्विट करत तथागत रॉय यांनी पुरस्कार परत करणा-यांवर टीका केली आहे.
कभी दही हांडी,आज पटाखा ,कल को हो सकता है प्रदूषण का हवाला देकर मोमबत्ती और अवार्ड वापसी गैंग हिंदुओ की चिता जलाने पर भी याचिका डाल दे !
— Tathagata Roy (@tathagata2) October 10, 2017
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र समर्थनासोबत तितकाच विरोधही होत आहे. फक्त हिंदूंच्या सणावरच कारवाई का केली जात आहे असा सवाल अनेकजण विचारत आहेत.
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील निर्णयावर नाराजी व्यक्त करत फक्त फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? असा प्रश्न विचारला होता. फटाक्यांविना मुलांसाठी दिवाळीचा अर्थ काय ? असा प्रश्न चेतन भगत यांनी विचारला. चेतन भगत यांनी एकामागोमाग एक सलग ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली.
'सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यावर बंदी आणली आहे ? पुर्णपणे बंदी ? लहान मुलांसाठी फटाक्यांविना काय दिवाळी ?' असं चेतन भगत यांनी पहिल्या ट्विटमध्ये विचारलं. चेतन भगत यांनी पुढे लिहिलं की, 'फटाकेबंदीवर मी विचारु शकतो का...हे करण्याची हिंमत फक्त हिंदूंच्या सणावेळीच का ? बक-यांचा बळी देण्यावर आणि मुहर्रममध्ये रक्त वाहण्यावरही बंदी येतीये का ?'.
चेतन भगत यांनी पुढे लिहिलं की, 'दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणणे म्हणजे ख्रिस्मसला ख्रिस्मस ट्रीवर, आणि बकरी ईदला बक-यांवर बंदी आणण्यासारखं आहे. परंपरांचा आदर करा'. आज आपल्याच देशात त्यांनी लहान मुलांच्या हातातून फुलबाजा हिसकावून घेतला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा माझ्या मित्रा', असं त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं. पुढे त्यांनी लिहिलं की, 'जे लोक दिवाळी फटाक्यांवर बंदी यावी म्हणून प्रयत्न करत आहेत, त्यांचा हाच उत्साह हत्या आणि हिंसा असणा-या दुस-या सणांच्यावेळी देखील पाहू इच्छितो'.