विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 11:16 PM2019-03-01T23:16:08+5:302019-03-01T23:23:23+5:30
भारताचे विंग कमांडर 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली- भारताचे विंग कमांडर 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानचं एफ-16 हे लढाऊ विमान पाडणारे विंग कमांडर वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतले आहेत. वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. तत्पूर्वी गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त सत्रात भारतीय वैमानिकाला शुक्रवारी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.
जाणून अभिनंदन यांनी पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्यापासून ते आतापर्यंतची पूर्ण कहाणी
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त केलं. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले. भारतीय हवाई दलाचे मिराज लढाऊ विमानं दहशतवादी ठिकाणांना नष्ट करून सुरक्षित परतली होती.
- भारतीय हवाई दलाच्या कारवाईनं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी नापाक योजना आखली. 27 फेब्रुवारीला पाकिस्तानची अनेक लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यात अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या एफ-16 विमानाचाही समावेश होता.
- पाकिस्तानी लढाऊ विमानांना नियंत्रण रेषेवर पाहून भारतीय हवाई दलानं लागलीच मोर्चा सांभाळला. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी राजौरीमध्ये घुसून भारतीय लष्कराच्या तळांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना चारही बाजूंनी घेरलं. पाकिस्तानच्या विमानांना पळवून लावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विमानांमध्ये भारताच्या मिग-21चाही समावेश होता. ज्या विमानाचं सारथ्य विंग कमांडर अभिनंदन करत होते.
- अवकाशात दोन्ही देशांची विमानं आमने-सामने आली होती. त्याचदरम्यान मिग 21चं सारथ्य करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. त्यामुळे शत्रूराष्ट्राच्या विमानांना पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. यावेळी भारताचं मिग -21 विमान कोसळलं आणि पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात विंग कमांडर अभिनंदन होते. विंग कमांडर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या द्वारे उडी घेतली. तिथे पाकिस्तान सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं.
- पहिल्यांदा पाकिस्ताननं दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा केला होता. परंतु त्यानंतर पाकिस्ताननं यू-टर्न घेतला आणि आमच्या ताब्यात एकच वैमानिक असल्याचं सांगितलं. भारतीय हवाई दलाच्या कारवाईच्या काही तासांनंतर पाकिस्तानी सेनेनं एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये IAF पायलट विंग कमांडर अभिनंदन यांची ओळख सांगण्यात आली.
- भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं त्यावर आक्षेप नोंदवला, तसेच वैमानिकाला ताब्यात घेऊन त्याचा व्हिडीओ बनवनं जिनिव्हा कराराचं उल्लंघन असल्याचा आरोप भारतानं पाकिस्तानवर केला. तसेच त्या जवानाला सोडण्यास सांगितले.
- भारत आणि पाकिस्तान हवाई चकमकीनंतर 27 फेब्रुवारीला पंतप्रधान इम्रान खान यांनी मीडियासमोर स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांनी भारतानं चर्चा करावी, अशी अटकळ बांधली होती. पाकिस्तानला युद्ध नको, तर चर्चा हवी, असंही ते म्हणाले होते.
- 28 फेब्रुवारीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवल्यास दोन्ही देशांमधील तणाव निवळणार असेल तर नक्कीच याचा विचार करू, असं म्हटलं होतं. परंतु भारतानं कोणत्याही अटी-शर्थीशिवाय विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यास सांगितलं होतं.
- 28 फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केली.
- भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला ताब्यात घेतल्यानंतर मोदी म्हणाले होते की, आताच एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. पहिल्यांदा प्रॅक्टिस करत होतो.
- 28 फेब्रुवारीला भारतीय हवाई दल, नौदल, सेना दलानं एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या पर्दाफाश केला.
- 1 मार्चच्या सकाळी भारतात विंग कमांडर यांच्या परतीची वाट पाहिली जात होती. वाघा बॉर्डरवर लोक जमले होते. त्यानंतर अनेक तासांनंतर आज विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आलं.