शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; भाविकांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:44 AM2018-10-20T06:44:09+5:302018-10-20T06:44:21+5:30
तिरुवनंतपुरम : शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात शुक्रवारीही प्रवेश मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना, मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने महिलांनी प्रवेशाचा ...
तिरुवनंतपुरम : शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात शुक्रवारीही प्रवेश मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना, मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ , अशी धमकीच दिली.
एक महिला पत्रकार व तिची एक सहकारी अशा दोघी जणी आज सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत सुमारे २५0 पोलीस संरक्षण होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर हेल्मेट आणि अंगात बुलेटप्रुफ जॅकेट होते. पोलिसांनीच त्यांना ते घालण्यास सांगितले होते. त्यांच्यासह पोलीस मंदिरापर्यंत पोहोचले, तेव्हा भाविकांनी त्यांचा रस्ताच रोखून धरला. पोलीसही त्या भाविकांना हटवू शकले नाहीत. त्याच वेळी महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ अशी धमकी दिली. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला.
Early morning visuals from Kerala's #SabarimalaTemple : Devotees throng Sannidhanam to offer prayers. pic.twitter.com/N8YSqVjVpV
— ANI (@ANI) October 20, 2018
आम्ही मंदिराच्या दरवाजापर्यंत महिलांना संरक्षण देऊ शकतो. त्यांना मंदिराच्या आत नेणे आमचे काम नाही, असे पोलिसांनीही स्पष्ट केले. अशा स्थितीत तिथूनच मागे फिरण्याचा निर्णय दोघा महिलांनी घेतला. त्या दोघींनी बाहेर आल्यावर पोलिसांचे तसेच प्रसार माध्यमांचे आभार मानले.
पुनर्विचार याचिका करणार
मंदिरात सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय मंदिराच्या प्रशासनाने आज संध्याकाळी घेतला. त्याचा निकाल लागेपर्यंत महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही आणि पोलीस संरक्षणात त्यांनी येण्याचा प्रयत्न केल्यास मंदिराचे मुख्य दरवाजे बंद करून निघून जायचे, असे मुख्य पुजारी के. राजीवरू यांनी जाहीर केले आहे.