'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 10:32 AM2017-08-29T10:32:02+5:302017-08-29T10:34:29+5:30
न्यायाधीश जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. त्याने त्यांच्यासोबत हे वर्तन करायला नको होतं'.
चंदिगड, दि. 29 - बलात्कार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावण्यात येण्याआधी गुरमीत राम रहीमने न्यायालयासमोर दयेसाठी याचना केली होती. इतकंच काय त्याला रडूही कोसळलं होतं. पण न्यायाधीश जगदीप सिंह यांच्यावर कोणताही फरक पडला नाही. त्यांनी कोणतीही दया माया दाखवली नाही. जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. त्याने त्यांच्यासोबत हे वर्तन करायला नको होतं'. यावेळी न्यायाधीशांनी नमूद केलं की, 'बलात्कार हा फक्त लैंगिक अत्याचार नाही, तर पीडित तरुणीचं संपुर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत असतो'.
न्यायाधीश बोलले की, 'राम रहीमने अंधश्रद्धेने त्याच्यावर भरोसा ठेवणा-या साध्वींचा विश्वासघात केला आहे आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं. एक व्यक्ती जो स्वत:ला एका धार्मिक संघटनेचा प्रमुख म्हणतो, त्याचं हे कृत्य देशाच्या पवित्र, अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांना कलंकित करण्याचं काम करत आहे. त्याच्या या कृत्यामुळे या संस्थांच्या विश्वासार्हतेला गेलेला तडा पुन्हा भरुन निघू शकत नाही'. बलात्कार प्रकरणी दोषी आढललेल्या गुरमीत राम रहीमची दया करण्याची मागणी फेटाळत न्यायाधीशांनी सांगितलं की, 'विनाकारण दया दाखवल्याने न्यायव्यवस्थेचं अधिक नुकसान होईल. तसंच लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही कमी होईल'.
न्यायाधीश जगदीप सिंह यांनी कडक शब्दात सुनावताना न्यायालय वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी असल्याचं सांगितलं. जगदीप सिंह बोलले आहेत की, 'या शिक्षेमुळे अशाप्रकारची वृत्ती असणा-यांना कडक संदेश मिळेल. सोबतच अशा प्रकारचं कृत्य करण्याआधी दोनवेळा विचार करेल'. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावली असून सोबत 30 लाखांचा दंडही ठोठावला आहे. यामधील 14-14 लाख रुपये बलात्कार पीडितांना मदत म्हणून दिले जाणार आहेत.
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणाºया बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १0 वर्षे याप्रमाणे एकूण २0 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३0 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी १४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी १0 वर्षे शिक्षा झाली असल्याने, बाबाला तब्बल २0 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. शिक्षा सुनावल्यावर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले, तेव्हा त्याचे भरजरी कपडे काढून तुरुंगातील वेश घालण्यासाठी दिला गेला.
सीबीआय न्यायालयाचे न्या. जगदीप सिंह यांना विशेष हेलिकॉप्टरने दुपारी रोहतक येथे आणण्यात आले. तेथून ते तेथील सुनरिया तुरुंगात गेले आणि त्यांनी बाबाला शिक्षा सुनावली. ती सुनावताच, बाबा राम रहीम धाय मोकलून रडू लागला आणि माफीची मागणी करू लागला. ‘माझ्यावर दया दाखवा, मी समाजसेवक आहे,’ असे तो हात जोडून सांगत होता. त्याच्या वकिलांनीही त्याची सजा कमी करावी, अशी मागणी केली, पण शिक्षेत बदल झाला नाही.
बाबा राम रहीमने २00२ साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिकाºयांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिकाºयांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.