२१ गावांपुढे पाणीटंचाईचा प्रश्न
By admin | Published: February 4, 2016 02:40 AM2016-02-04T02:40:46+5:302016-02-04T02:40:46+5:30
शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.
महाड : शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. दीड वर्षापूर्वी या धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याच्या कामाला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने महाड शहरासह २१ गावांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवाय या धरणाला पडलेल्या भगदाडामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे.
महाड रायगड मार्गालगत १९७४ मध्ये कोथुर्डे येथील नदीवर हे पाटबंधारे विभागामार्फत बंधाराकम धरण बांधण्यात आले होते. या धरणातील पाण्यावर महाड शहरासह रायगड मार्गावरील अनेक गावांच्या नळपाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. फेबु्रवारी महिन्यानंतर परिसरातील वाहणाऱ्या गांधारी नदीमध्ये या धरणाचे पाणी सोडले जाते व या नदीच्या पात्रात असलेल्या जॅकवेलमधून या परिसरातील गावांची तहान भागवली जात आहे. जुलै २०१४ मध्ये पावसाळ्यात या धरणाच्या भिंतीला २० फूट खोल खड्डा पडून भिंतीचा भाग खचला होता. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती केली तरी भगदाडातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. या धरणाल धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असून, तो पाटबंधारे विभागात मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
धरणाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ९६ लाख इतका खर्च अपेक्षित असून, मुख्य विमोचन विहीर जलवाहिनी दुरुस्ती व अश्वपटल मातीकाम आदी कामे केली जाणार आहेत. २०१४ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काम करण्यासाठी धरणातील पाणी सोडल्यास पाणीटंचाई निर्माण झाली असती. त्यामुळे धरणातील पाणी न सोडताच धरणाची दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याने हे काम रखडल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)