भाजपचे मताधिक्य वाढले, शेकापची मात्र पिछेहाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:52 AM2019-10-25T00:52:25+5:302019-10-25T00:52:32+5:30
२०१४ च्या तुलनेत शेकापची सुमारे २५ हजार मते घटली
- मयूर तांबडे
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकाप आघाडीच्या हरेश केणी यांचा विक्रमी ९२ हजार ३७० मतांनी पराभव केला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत पनवेलमध्ये भाजपचे मताधिक्य ५३ हजारांनी वाढले असून शेकापचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा २५ हजारांनी कमी झालेले दिसून येत आहे. शहरीकरणाचा फटका शेकापला बसल्याचे या निवडणुकीत दिसून येत आहे.
पनवेलमध्ये २०१९ च्या निवडणुकीत केवळ ५४ टक्के मतदान झाल्याने त्याचा फायदा व नुकसान कोणाचे होते, याची चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गुरुवारच्या निवडणूक निकालाकडे राहिले होते. सकाळी ८.१५च्या सुमारास व्ही. के. हायस्कूल येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळी शेकाप आघाडी व भाजप-सेना कार्यकर्त्यांची तुरळक गर्दी दिसून होती. ९.३०च्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.
प्रत्येक फेरीचे निकाल लागत गेले व प्रशांत ठाकूर विजयाची आघाडी घेत गेले. या वेळी भाजपचे झेंडे कार्यकर्ते भिरकवत होते. तर भाजपला मिळत गेलेली आघाडी पाहून शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. जवळपास लाखाच्या फरकाने मिळालेला विजय पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून, फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रशांत ठाकूर विजयी झाल्यानंतर गावागावांत आनंद व्यक्त करण्यात आला.
२०१९ व्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे मताधिक्य गेल्या निवडणुकीपेक्षा ५३ हजार ४३९ मतांनी वाढले. तर शेतकरी कामगार पक्षाचे हरेश केणी यांना या निवडणुकीत ८६ हजार २११ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना एक लाख ११ हजार ९२७ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत २५ हजार ७१६ मतांनी शेकापचे मताधिक्य कमी झाले आहे. या निवडणुकीत कमी झालेल्या मतदानामुळे शेकापवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पनवेल, उरण, पेण, अलिबाग या चार तालुक्यांतील शेकापच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. शेकापचे पेण येथील विद्यमान आमदार धैर्यशील पाटील व अलिबागचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर उरण येथे माजी आमदार विवेक पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे.
पनवेल विधानसभा निवडणुकीत नोटाला तिसºया क्रमांकाची मते मिळाली. नोटाने १२ हजार ३७१ मते मिळवली. भाजप व शेकाप उमेदवारानंतरची ही सर्वाधिक मते आहेत.