फेसबुकमुळे सापडला पळालेला मुलगा; तीन वर्षांपूर्वी सोडलेले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:04 AM2017-11-04T04:04:48+5:302017-11-04T04:05:26+5:30
दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले.
नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. घर सोडून गेल्यानंतर तो नाशिक येथील ढाब्यावर काम करत होता.
सागर भालेराव हा दहावीचा विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार जानेवारी २०१४ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याअनुषंगाने सखोल तपास करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सर्व पोलीस ठाणे, सोशल मीडिया यावर त्याचे छायाचित्र प्रसारित करूनही त्याच्याविषयीची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अशातच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील काही वर्षांत बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलांचा नव्याने शोध घेण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान बेपत्ता असलेल्या सागर भालेराव याच्याविषयीची संशयास्पद माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार शशिकांत पाटील, विकास जाधव यांंच्या पथकाने तपासाला सुुरवात केली होती. सागर याच्या आतेभावासोबत एक तरुणी फेसबुकवर चॅटिंग करत होती. मात्र सदर तरुणीबाबत त्याला संशय होता. यामुळे त्याने सदर बाब पोलिसांंना सांगितली होती. यामुळे फेसबुकवरील सदर खात्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला असता, त्याचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याद्वारे व्हॉट्सअॅप तपासला असता सागरच्या चेहरापट्टीशी मिळताजुळता चेहरा असल्याचे समोर आले. शिवात तो नाशिकमधील उमराणे गावात ढाब्यावर नोकरीला असल्याचेही तपासात उघड झाले. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाने सागरच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना घेवून सदर ठिकाणी गेले. यावेळी सागर भालेराव हा त्याठिकाणी आढळून आला. यावेळी सागर याने दहावीच्या परीक्षेच्या भीतीमुळे घर सोडल्याचे सांगितले. तर घर सोडल्यानंतर तो नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सदर ठिकाणी ढाब्यावर कामाला लागला होता. फेसबुकवर खाते खोलण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक असल्यामुळे मोबाइल नंबरमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोचले.