वाशी स्टेशनबाहेर फेरीवाल्यांविरोधात मनसेचं खळ्ळखट्यॉक : मनसेच्या 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 12:09 PM2017-10-30T12:09:16+5:302017-10-30T12:49:32+5:30
वाशी रेल्वे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये 5 मनसे कार्यकर्ते हजर झाले आहे.
नवी मुंबई - वाशी रेल्वे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये 5 मनसे कार्यकर्ते हजर झाले आहे. श्रीकांत माने, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे, सागर नाईकारे या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी वाशीतील फेरीवाल्यांविरोधात मनसेचं खळ्ळखट्यॉक
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने रविवारी नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळखट्याक केले. फेरीवाल्यांना हटवताना मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. रविवारी नवी मुंबईतील वाशी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडत अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना हुसकावून लावले.
दरम्यान, फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपा आणि मनसेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. हप्तेबाजी सुरू राहावी, यासाठी फेरीवाल्यांना नियमित केले जात नाही. मनसेचेही काही नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप निरूपम यांनी केला.
फेरीवाल्यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्यास काहीही चुकीचे नसल्याचे सांगत निरूपम म्हणाले की, फेरीवाले जिथे कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र, जिथे फेरीवाले मजबूत असतील तर तिथे मनसेला मार खावाच लागेल. मनसेचे कार्यकर्ते गेले अनेक दिवस मुंबई आणि उपनगरात मारहाण करतात; परंतु गुन्हा दाखल होत नाही. मनसे अध्यक्ष परवानगीशिवाय मोर्चा काढतात, तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही; पण मी फेरीवाल्यांसोबत बैठक घेतली, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप निरूपम यांनी केला.
फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. मुख्यमंत्री आणि आयुक्तांना कोण रोखत आहे. कोणाला अवैध फेरीवाले बंदच करायचे नाहीत. त्यांना हा धंदा सुरूच राहावा असे वाटते. या फेरीवाल्यांकडून अनेक पक्षातील नेते हप्ता घेतात. मनेसेचेही काही नेते हप्ता घेतात. त्यांची नावे मी लवकरच सांगणार आहे, असेही ते म्हणाले. संजय निरूपम यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनाही टोला लगावला. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. तसेही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.
संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल
मनसेचे मालाडमधील विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मालाड पोलिसांनी याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. माळवदे यांच्यावर हल्ला करणाºया सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी व मनसेचे संदीप देशपांडे यांच्याविरोधात फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळवदे यांना शनिवारी फेरीवाल्यांच्या जमावाने मारहाण केली होती. पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण, ठार मारण्याची धमकी, दंगल प्रकरणी गुन्हा दाखल करून यापैकी ७ जणांना अटक केली आहे. त्याच वेळी निरूपम यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शनिवारी धक्काबुक्कीही झाली होती. या वेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून दिले.