सीटी स्कॅन सुविधा कागदावरच
By admin | Published: July 10, 2015 03:08 AM2015-07-10T03:08:17+5:302015-07-10T03:08:17+5:30
सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा पुरविण्याचा टेंभा मिरविणाऱ्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.
नवी मुंबई : सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा पुरविण्याचा टेंभा मिरविणाऱ्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे ही महत्त्वपूर्ण सुविधा केवळ कागदावरच राहिली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांचे फावले असून एमआरआय आणि सीटी स्कॅनसाठी रुग्णांची अक्षरश: लूट सुरू आहे.
पालिकेच्या वाशी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दिवसाला १२०० ते १५०० रुग्ण येतात. त्यापैकी सरासरी २५ ते ३० रुग्णांना एमआरआय किंवा सीटी स्कॅनची गरज भासते. प्रथम संदर्भ रुग्णालयात ही सुविधा नसल्याने अशा रुग्णांना शेजारच्या हिरानंदानी किंवा इतर खासगी रुग्णालयांकडे पाठविले जाते. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी ५००० ते ६५०० रुपये तर सीटी स्कॅनसाठी २००० ते २५०० रुपये आकारले जातात. हे थांबवण्यासाठी पालिका रुग्णालयांत सीटी स्कॅन सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसाधारण सभेत तसा ठरावही झाला होता. चालू अर्थसंकल्पात १७ कोटी रुपयांची तरतूदही आहे. असे असतानाही एमआरआय आणि सीटी स्कॅन मशिन बसविण्यासाठी रुग्णालयात जागा नसल्याच्या कारणावरून हा प्रस्ताव रखडल्याचे समजते.
तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन आणि एमआरआय मशिनचा जुना प्रस्ताव बारगळला आहे. आउटसोर्सिंगमधून ही सेवा देण्याचा सुधारित निर्णय घेण्यात आला. प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
> महापालिकेच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, ड्युटीवर असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे रुग्णांबरोबरचे वर्तन आदी विविध कारणांमुळे महापालिकेची आरोग्य सेवा नेहमीच वादात सापडली आहे. एकूणच नवी मुंबईकरांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे सत्ताधाऱ्यांचे आश्वासन फोल ठरले आहे.