शहरातील जलसंपत्तीचे महत्त्व कळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:08 AM2018-05-29T02:08:10+5:302018-05-29T02:08:10+5:30
जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे
नामदेव मोरे
नवी मुंबई : जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे. परंतु मोरबे धरण वगळता इतर जलसाठ्याचा वापरच होत नाही. पाण्याची उधळपट्टी सुरू असून बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे एकमेव शहर असून भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
देशातील सर्व प्रमुख महानगरांना तीव्र उकाड्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांमध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच पाणी मिळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत असून अनेक गावांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु नवी मुंबई हे एकमेव शहर असे आहे जिथे मे अखेरीसही चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. अशाप्रकारे उधळपट्टी करणारे एकमेव शहर आहे. बहुतांश उद्याने व पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी शुद्ध पाण्याचाच वापर केला जात आहे. वास्तविक नवी मुंबईमध्ये मोरबे धरणाव्यतिरिक्त प्रचंड जलसाठा उपलब्ध आहे. दिघा येथील रेल्वेच्या धरणामध्ये उन्हाळ्यातही भरपूर पाणी आहे. परंतु हे धरण हस्तांतर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन वर्षापूर्वी हस्तांतरणासाठी आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवाद सुरू होता. प्रत्यक्षात पाण्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये २४ तलाव असून त्यामधील पाण्याचा काहीही उपयोग केला जात नाही. याशिवाय शहरात १३२ विहिरी आहेत. विहिरींची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक विहिरी बुजविल्या जात आहेत. देशातील सर्वात चांगली मलनि:सारण केंद्रे नवी मुंबईमध्ये आहेत. सात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. परंतु येथील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. वास्तविक शहरातील रेल्वेचे धरण, विहिरी व तलावांसह मलनि:सारण केंद्रामधील पाण्याचा वापर बांधकाम व्यवसाय, उद्यान व इतर वापरासाठी केला जावू शकतो. पण यासाठीची यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर केला नाही तर भविष्यात इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईकरांनाही पाणीसमस्येला सामोरे जावे लागू शकते.
उद्यानांना पाणी वापरण्यास सुरुवात
शहरातील मलनि:सारण केंद्रामधील प्रक्रिया केलेले पाणी काही उद्यानांना पुरविले जात आहे. परंतु पाण्याचा उपलब्ध साठा व होणारा वापर यामध्ये प्रचंड तफावत आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडून द्यावे लागत असून याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.