एपीएमसीतील आंब्याची आवक दुप्पट
By admin | Published: April 7, 2017 01:53 AM2017-04-07T01:53:26+5:302017-04-07T01:53:26+5:30
आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने कोकण आणि कर्नाटकी हापूसची आवक ५० टक्क्यांनी वाढली असून दरांमध्ये ४० टक्के घट झाली आहे. वाशीतील फळ बाजारपेठेत गुरुवारी कोकणातील हापूसची ४४ हजार १०७ क्रेट आंब्यांची आवक झाली आहे, तर ३७ हजार ७८ क्रेट, पेट्या ही कर्नाटकी हापूसची आवक झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा काही महिने अगोदरच आंब्याची चव चाखता आली. वाढत्या उष्णतेमुळेही फळांच्या राजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. ४००० ते ८००० रुपये किमतीने विकल्या जाणाऱ्या आंब्याच्या पेट्या १ हजार ते ४००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याला ६७ हजार ३९२ क्रेट, आंब्याच्या पेटींची आवक झाली होती. मात्र आठवडाभरातच ही आवक वाढली असून ८१ हजारांवर पोहोचली आहे. पुढील आठवड्यात आंब्याची मागणी वाढणार असून, दर घटण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. गुढीपाडव्यानंतर वाशी फळ बाजारातील आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दर स्थिरावतील : गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत आणखी वाढ झाली असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेली आवक पाहता या वर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच दरात घट झाली असून यापुढे दर स्थिरावणार असल्याची माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.