अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:34 AM2017-09-02T02:34:42+5:302017-09-02T02:34:59+5:30
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली
पनवेल : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली. मात्र मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परतीचा प्रवास करणाºया चाकरमान्यांना धक्के खावूनच परत यावे लागणार असल्याची परिस्थिती या मार्गावर उद्भवली आहे.
गणेशोत्सवापूर्वी हजारो चाकरमानी गावाकडे जात असतात. यावेळी परिवहन विभागाच्या वतीने देखील जादा बसेस कोकणाकडे सोडल्या जातात. खासगी वाहने देखील या मार्गावर मोठ्या प्रमाणात या काळात धावत असतात.
सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यातच मुसळधार पावसाने रस्ता खचणे, रस्ता वाहून जाण्याचा प्रकार याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
पळस्पे फाट्यावरून सुरू झालेली खड्ड्यांची मालिका पेणच्या पुढे सुरू असल्याने या मार्गावरील वेग पुन्हा मंदावला आहे. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने हे खड्डे आणखी मोठे झाले आहेत.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अद्याप दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले नसल्याने या विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गावर धावणार आहेत. त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे पळस्पे येथील रहिवासी अनिकेत भगत यांनी सांगितले.
कल्हे परिसरात मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी खोदकाम तर काही ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे महामार्गालगत पाणी साचल्याने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत.