वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांना बे्रक, वाहतूककोंडीमुळे असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:53 AM2017-08-29T02:53:26+5:302017-08-29T02:53:39+5:30
वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे
नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे. नियमित होणाºया कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार स्वत:ची जबाबदारी झटकत असल्यामुळे खड्डे नक्की बुजवायचे कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले असून, वाशी ते कळंबोलीपर्यंत रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. या समस्येमध्ये आता वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांचीही भर पडली आहे. मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर जवळपास अर्धा फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून हजारो वाहने रोज मुंबईकडे येत असतात. याशिवाय पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातून नोकरी व व्यवसायासाठी चार ते पाच लाख नागरिक महामार्गावरून मुंबईकडे जातात. जुना खाडी पूल धोकादायक असल्याने त्यावरून फक्त मोटारसायकल व हलकी वाहने अपवाद स्थितीमध्ये जात असतात. पूर्ण वाहतूक नवीन खाडी पुलावरून जात असते. सद्यस्थितीमध्ये पुलावरील खड्ड्यांमुळे रोज सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. दुपारी व काही वेळेला सायंकाळीही अनेक वेळा वाहतूक धिम्या गतीने सुरू असते.
खाडी पुलावरील वाहतूककोंडी अनेक वेळेला वाशी गाव ते वाशी प्लाझापर्यंत येऊ लागली आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळी व सायंकाळी जादा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे. टोल कंपनीकडेही याविषयी पाठपुरावा केला आहे; पण दोन्हीकडून खड्डे बुजविण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी झटकली जात आहे. यामुळे खड्डे बुजविण्यासाठी नक्की कोणाकडे व कसा पाठपुरावा करायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.