जुईनगरमध्ये रस्ता खचल्याने अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष : रिक्षाचे नुकसान होऊन चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:37 AM2017-10-12T02:37:45+5:302017-10-12T02:37:55+5:30
जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.
नवी मुंबई : जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सेक्टर २५मधील चिंचोली तलावाजवळ मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रोड खचला. प्रवासी घेऊन जाणारा रिक्षा एमएच ४३ एसी ४४५९ खड्ड्यामध्ये अडकली. यामध्ये रिक्षाची पुढील काच, चाक व इतर नुकसान झाले आहे. जोरात धक्का बसल्याने रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी रिक्षा बाजूला करून चालकाला रुग्णालयात नेले. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले होते. या घटनेनंतर नगरसेवक रंगनाथ औटी व विशाल ससाणे यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाºयांना माहिती दिली; परंतु सकाळी ११ वाजेपर्यंत अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मलनि:सारण व रस्ते बांधणाºया विभागाने एकमेकांवर जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनास्थळी रंगनाथ औटी, विशाल ससाणे यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांनीही भेट दिली.