ईएसआयसी कामगार वसाहत मोडकळीस
By Admin | Published: June 20, 2017 06:02 AM2017-06-20T06:02:34+5:302017-06-20T06:02:34+5:30
पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे.
सूर्यकांत वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतरही वाशीतील ईएसआयसी वसाहतीमधील कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांच्या राहण्याची पर्यायी सोय केली जात नसल्यामुळे, ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पालिकेने गतवर्षी त्या ठिकाणच्या चार व यंदा नऊ इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण वसाहतच राहण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, यानंतरही कामगारांची राहण्याची पर्यायी सोय न करता, ईएसआयसी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कामगारांच्या जीवावर टांगती तलवार निर्माण केली आहे.
शासनाच्या वाशीतील कामगार रुग्णालयाचे कामगार मागील अनेक वर्षांपासून रोज मृत्यूशी सामना करत आहेत. इमारत मोडकळीस आलेली असतानाही, त्यांचे त्या ठिकाणी वास्तव्य सुरू आहे. काही कामगार निवृत्तीच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यांच्याकडून आलेला दिवस कसाबसा काढण्याचे काम सुरू आहे. मागणी करूनही रुग्णालय प्रशासन कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवत नसल्याचीही खंत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनच कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. गतवर्षी महापालिकेने त्या ठिकाणच्या चार इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. या वेळी तीन इमारतींमधील कामगारांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच यंदा महापालिकेने त्या ठिकाणच्या उर्वरित नऊ इमारतीही धोकादायक घोषित केल्या आहेत. सर्वच इमारतींची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नसल्यामुळे या इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात इमारतींची डागडुजी झाली नसली, तरी प्रतिवर्षी डागडुजीचा खर्च मात्र मंजूर होत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे बळी कामगार ठरू नयेत, याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
मोडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी केल्यानंतर त्या इमारतींचा रहिवासी वापर होऊ शकतो. यामुळे अनेकदा कामगारांनी इमारतींसह संपूर्ण घरांच्या डागडुजीची मागणी केली आहे; परंतु निधीअभावी इमारतींच्या डागडुजीला टाळाटाळ करणारे वरिष्ठ अधिकारी, मर्जीतल्या कामगारांच्या घरांवर मात्र लाखोंचा खर्च करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. मोडकळीस आल्याने खंडर झालेल्या इमारतींभोवती झाडी वाढली असून, त्यामध्ये विषारी प्राण्यांचे वास्तव्य होऊ लागले आहे. मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी साप आढळून आले असल्याने लहान मुलांचे घराबाहेर खेळणेही धोकादायक झाले आहे.