सायन महामार्गावर वाहतूककोंडी, उरण फाटा येथे गॅसचा टँकर पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:08 AM2017-12-14T05:08:45+5:302017-12-14T05:08:55+5:30

सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे गॅस टँकर पलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

 Gas tanker over Sion Highway, traffic tanker at Uran Phata | सायन महामार्गावर वाहतूककोंडी, उरण फाटा येथे गॅसचा टँकर पलटी

सायन महामार्गावर वाहतूककोंडी, उरण फाटा येथे गॅसचा टँकर पलटी

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे गॅस टँकर पलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र, अपघातग्रस्त गॅस टँकर मार्गावरच पडून राहिल्याने दुपारपर्यंत सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
एलपीजी गॅस कंपनीचा टँकर पुण्याच्या दिशेने जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. उरण फाटा पुलाच्या सुरुवातीला चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दुभाजकाला धडकून पटली झाला. या वेळी टँकरमध्ये चालकासह इतर एक जण होता. अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र, टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस भरलेला असल्याने त्याची गळती झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. त्यामुळे उरण फाटा पुलावरील वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. हा अपघातग्रस्त टँकर दुपारपर्यंत मार्गातून हटवण्यात आलेला नव्हता. अपघातग्रस्त टँकर मार्गातून हटवण्यापूर्वी त्यामधील गॅस काढणे गरजेचे होते. त्याकरिता रिकामा गॅस टँकर मागवण्यात आला होता. तो दुपारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एका टँकरमधील गॅस दुसºया टँकरमध्ये काढण्याचे काम सुरू झाले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती, परंतु काही प्रमाणात गॅसची दुर्गंधी येत असल्याने त्याठिकाणी गॅस गळतीची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पुलावर वाहनांना बंदी करून पुलाखालून रहदारी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे उरण फाटा पुलाखाली चक्का जाम होऊन दोन्ही दिशेच्या मार्गावर वाहनांच्या सुमारे पाच ते सात किमीच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. पर्यायी वाशी व सीबीडी येथून पामबीच मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी तुरळक रहदारी असलेल्या पामबीच मार्गावर देखील वाहतुकीचा खोळंबा झाला होता, तर सीबीडी ते सानपाडा या अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे एक तास लागत होता. संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे सायन-पनवेल मार्गाने प्रवास करणाºयांना बुधवारचा दिवस चांगलाच डोकेदुखीचा ठरला.
अशातच मुंब्रा मार्गे कळंबोलीकडे जाणारी वाहतूक ऐरोली मार्गे सायन-पनवेल मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावर ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे याठिकाणी जागोजागी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांचेही चांगलेच हाल झाले. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलिसांची कसोटी लागत आहे.

प्रवाशांची गैरसोय
अपघातामुळे उरण फाटा ते खारघरदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पामबीच रोडवरून वळविण्यात आली होती; परंतु अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे व रोडचे काम सुरू असल्यामुळे पामबीच रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. यामुळे सकाळी कार्यालयात निघालेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.

Web Title:  Gas tanker over Sion Highway, traffic tanker at Uran Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.