दोन पुस्तके द्या आणि आजीवन सभासद व्हा
By admin | Published: November 24, 2015 01:46 AM2015-11-24T01:46:27+5:302015-11-24T01:46:27+5:30
सदस्यत्वाचे पैसे नाहीत किंवा फी भरल्याची पावती नाही. वाचन संस्कृती जोपासण्याकरिता कुठलीही दोन पुस्तके द्या आणि वाचनालयाचे सदस्यत्व व्हा असा उपक्रम ब्रम्हांड कट्टा
भाग्यश्री प्रधान, ठाणे
सदस्यत्वाचे पैसे नाहीत किंवा फी भरल्याची पावती नाही. वाचन संस्कृती जोपासण्याकरिता कुठलीही दोन पुस्तके द्या आणि वाचनालयाचे सदस्यत्व व्हा असा उपक्रम ब्रम्हांड कट्टा वाचनालयाकडून राबवला जात असून त्याला वाचकांचा, पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सामान्यपणे कुठल्याही वाचनालयात पैसे भरून सदस्यत्व घेता येते. त्यामुळे महिन्याची वर्गणी, लेट फी, पुस्तक हरवल्यास दंड अशी रोखीच्या व्यवहारांची औपचारिकता येते. ब्रम्हांड कटट्यातंर्गत चालवण्यात येणाऱ्या वाचक कट्टा वाचनालयाचे सदस्यत्व घेण्यासाठी कुठलीही दोन पुस्तके देऊन आजीवन सदस्यत्व मिळवता येते. ही संकल्पना व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांची आहे. ज्याला खरोखर पुस्तकांच्या वाचनाची गोडी आहे, ज्याच्याकडे पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड आहे, जो पुस्तकांवर प्रेम करतो अशीच व्यक्ती या वाचनालयाची सदस्य होऊ शकते. केवळ शेजाऱ्याने लायब्ररी लावली म्हणून मी ही लावली या न्यायाने पुस्तके घरी नेऊन ठेवणाऱ्या व त्यावरील धूळ साफ करून ती परत आणून देणाऱ्या दिखाऊ वाचकांना त्यामुळे येथे प्रवेश करण्याची संधीच उपलब्ध होणार नाही. वाचनातून वाचन संस्कृती जोपासण्याकरिता हा प्रकल्प राबविण्यात आला असल्याचे कटट्यातर्फे सांगण्यात आले.
हे वाचनालय ब्रम्हांड प्रवासी महासंघ, धर्माचा पाडा येथे असून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ५.३० ते ७.३० हे वाचनालय सदस्यांसाठी सुरू असते. तसेच १५-२० दिवस वाचनासाठी पुस्तके घरी दिली जातात. या वाचनालयाला दाजी पणशीकर, रोटरी क्लब मिड टाऊन, ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांनी या वाचनालयाला बुकशेल्फही भेट दिले आहे. या वाचक कट्ट्याला उत्स्फूर्र्त प्रतिसाद मिळत आहे.
या वाचनालायचे व्यवस्थापन सुमित लोखंडे आणि अनिल अस्वले हे करत असून ब्राम्हांड कटट्याचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी यासाठी हातभार लावल्याचे वाचनालय समितीतर्फे सांगण्यात आले. या वाचनालयात १०० सभासद असून जास्तीत जास्त तरूणांनी पुस्तके देऊन वाचनसंस्कृती वृद्धींगत करावी, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले.