तरुणांमध्ये बळावतोय उच्च रक्तदाब
By Admin | Published: June 22, 2017 12:14 AM2017-06-22T00:14:28+5:302017-06-22T00:14:28+5:30
जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एकत्र आले, असे आपण म्हणतो; परंतु या एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांचे गुण-दोष नकळत अंगीकारत असतो.
प्राची सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एकत्र आले, असे आपण म्हणतो; परंतु या एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकांचे गुण-दोष नकळत अंगीकारत असतो. या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक जीवघेणे आजार भारतामध्ये वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मोठे घर व गाडी, वर्षातून दोन ते चार वेळा कुटुंबीयांसोबत परदेशी सहली, अशी जीवनशैली प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. मात्र, या हव्यासापोटी तरुणांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. कामाचे तास वाढविणे, बैठी जीवनशैली, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे अथवा कामाच्या व्यापात जेवणाला दांडी मारणे, असे प्रकार आजूबाजूला पाहायला मिळतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरु वात होते.
संगणकासमोर तासन्तास बसून काम करत राहिल्याने तरुणांची शरीराची हालचाल मंदावलेली असते, तसेच व्यायामाच्या अभावाने शरीरातील मेद वाढतो. तरुणांमध्ये दारू व तंबाखू याचे व्यसन मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये जर उच्च रक्तदाबाची लागण झाली हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणामाचा संभव असतो. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत ३० टक्क्यांहून अधिक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित असून, यातील ५० टक्के लोकांना पहिली ५ ते ८ वर्षे याची कल्पनाही नसते. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाचा विकार वाढतो आहे. नोकरी मिळविण्यापासून ते टिकविण्यासाठी स्पर्धा वाढली असल्यामुळे, वयाच्या पंचविशीमध्ये उच्च रक्तदाबाला आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्र कमी होऊन, सेवाक्षेत्रातील नोकऱ्या वाढल्या आहेत. त्यातही आयटी, बीपीओसारख्या नोकऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. कॅन्टीन फूड, सेवा क्षेत्रातील सततच बैठे काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणे, पॅनिक होणे, ताणतणाव वाढणे, असे विकार वाढीस लागले आहेत.
गेल्या १० वर्षांत उच्च रक्तदाबाच्या वयाचा आलेख हा खाली येत असून, वयाच्या तिशीतल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती डॉ. बेहराम परडीवाला यांनी दिली. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर चांगला आहार, विहार, विचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.
सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामधील चांगल्या-वाईट घटकांच्या परिणामामुळे अनेकांना नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हृदयविकार, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, पक्षाघाताचा झटका येणे, असे धोके यामुळे संभवतात. घर आणि आॅफिस अशा दुहेरी भूमिका बजाविणाऱ्या महिलांमध्येही रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.