खाडीमध्ये दोन बेटांचा समावेश, पर्यटनस्थळ विकसित करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:24 AM2017-10-28T02:24:07+5:302017-10-28T02:24:17+5:30
नवी मुंबई : रौप्य महोत्सव साजरा करणा-या महापालिकेला खाडीकिना-यांच्या सुशोभीकरणाचा विसर पडला आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : रौप्य महोत्सव साजरा करणा-या महापालिकेला खाडीकिना-यांच्या सुशोभीकरणाचा विसर पडला आहे. बेलापूरमधील शहाबाज गावच्या हद्दीत खाडीमध्ये दोन बेटांचा समावेश आहे. २५ वर्षांमध्ये या बेटांचे हस्तांतर करण्यास अपयश आले आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर या परिसराचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर करता येणे शक्य होणार आहे.
नवी मुंबईचा समावेश देशातील प्रमुख श्रीमंत महापालिकांमध्ये केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये मोरबे धरणासह जवळपास १९८१ मालमत्ता पालिकेच्या ताब्यात असून त्यांची किंमत २५ हजार कोटींपेक्षा जास्त होत आहे. महापालिका सिडको व एमआयडीसीकडून विविध सामाजिक कामांसाठी भूखंडांची मागणी केली असून टप्प्याटप्प्याने हस्तांतरणाची प्रक्रिया मार्गी लावली जात आहे. मालमत्ता ताब्यात घेत असताना शहरातील नैसर्गिक सौंदर्यस्थळांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. महापालिकेला २२ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे, परंतु खाडीकिनाºयांचे सुशोभीकरण करण्यात पालिकेला अपयश आले आहे.
पालिका मुख्यालयासमोर शहाबाज गावच्या हद्दीमध्ये दोन बेटांचा समावेश आहे. सर्वे नंबर २६० व २६१ हे दोन्ही भूखंड खाडीच्या मध्यभागी आहेत. महापालिकेच्या हद्दीत असलेले भूखंड ताब्यात घेतले तर त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करणे शक्य होणार आहे. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रामध्ये या बेटांचा परिसर अत्यंत आकर्षक दिसत आहे. खाडीच्या मध्यभागी ही दोन्ही बेटे आहेत. उरणकडे जाणा-या पुलावर उभे राहिल्यानंतरही ते सहज नजरेस पडत असून पालिकेने आतापर्यंत त्याकडे का दुर्लक्ष केले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये दोन बेटांचा समावेश असल्याची माहितीच आतापर्यंत पालिका प्रशासनाला नव्हती. शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी याविषयी सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. मनपा हद्दीमध्ये किती बेटे आहेत, असल्यास त्यांचा ताबा कोणाकडे आहे ? बेटांच्या संरक्षणाबाबत किंवा त्यांना पर्यटन केंद्र बनविण्यासाठी काही उपाययोजना पालिकेने आखली आहे का, असा प्रश्न विचारला होता. मालमत्ता विभागाने अद्याप बेटांचे हस्तांतरण झाले नसल्याची माहिती दिली आहे.
नगररचना विभागाने याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. मनपा क्षेत्रामध्ये ३० महसुली गावांचा समावेश आहे. महसुली गावाचा अभिलेख तपासले असता मौजे शहाबाज बेलापूर येथील सर्वे नंबर २६०, २६१ व एक बेट अशी जमीन असून गावच्या दक्षिण दिशेला पनवेल खाडीमध्ये आहे. सदर सर्वे नंबरचे क्षेत्र व बेट असलेली जमीन ही स्वरूपात खाडीमध्ये आहे.
महसूल गावच्या हद्दीचा विचार करता उपरोक्त सर्वे नंबर २६० व २६१ व एक बेट अशी एकूण दोन बेटे ही जमीन नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीमध्ये येत आहे. सदर ठिकाणी पर्यटन क्षेत्र बनविण्याचा कोणताही प्रस्ताव सद्यस्थितीमध्ये नसल्याचे उत्तर नगररचना विभागाने दिले आहे.
>बेटांना ऐतिहासिक वारसा
शहाबाजजवळील बेटांना ऐतिहासिक वारसा आहे. बेलापूर किल्ल्यापासून जवळच असलेल्या या बेटांवर पोर्तुगीज काळात व नंतर चिमाजी आप्पांनी किल्ला जिंकल्यावर या बेटांचा वाहतुकीसाठी वापर केला जात होता. सैनिकांचा तळही येथे तयार करण्यात आला होता. यापूर्वीही बेटांवर तोफा व इतर ऐतिहासिक वस्तू आढळून आल्याचे बोलले जात आहे.
तोफा गेल्या कुठे?
शहाबाजजवळील दोन्ही बेटांवर यापूर्वी ऐतिहासिक तोफा होत्या, अशी माहिती उपलब्ध होत आहे, परंतु या तोफा काही व्यक्तींनी गायब केल्या आहेत. काहींच्या फार्महाऊस व इतर ठिकाणी या तोफा नेल्या असल्याचेही बोलले जात आहे. येथे तोफा होत्या का व त्यांचे काय झाले याचीही चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी होवू लागली आहे.
जमीन हडपण्याची भीती
महापालिका क्षेत्रामधील दोन्ही बेटांची मालकी कोणाकडे आहे याविषयी तपशील महापालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये दिलेला नाही. सर्व्हे नंबर २६० व २६१ क्रमांकाच्या बेटांवरील जमीन हडपण्याचा प्रयत्नही होवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने दोन्ही बेटांचे हस्तांतरण करून घेण्याची मागणी होत आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये शहाबाजजवळ दोन बेटे आहेत. ही बेटे हस्तांतर करून त्याठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे. दोन्ही बेटांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ तयार करता येईल.
- किशोर पाटकर,
नगरसेवक, शिवसेना.