उलवेमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:25 AM2018-02-06T02:25:53+5:302018-02-06T02:25:56+5:30

सीवूड्स-उरण या मार्गावरील सिडकोनिर्मित उलवे नोडचा विकास झाल्याने येथील रहिवाशांची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे.

Infrastructural facilities in Ulway | उलवेमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

उलवेमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

googlenewsNext

प्राची सोनवणे
नवी मुंबई : सीवूड्स-उरण या मार्गावरील सिडकोनिर्मित उलवे नोडचा विकास झाल्याने येथील रहिवाशांची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. मात्र दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. नोडमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने येथे नागरीकरणाने वेग घेतला असून सिडकोने इतर दळणवळणाची साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
गटाराची उघडी झाकणे, उखडलेले रस्ते, पदपथ, खेळासाठी मैदाने तसेच उद्यानाचा अभाव, आरोग्य सुविधा, फळ-भाजीपाल्यासाठी मंडईची कमतरता, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी उलवे नोडमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी प्रत्येक नोडमध्ये अपूर्ण कामांमुळे जागा अडविली असून त्यामुळे परिसरात पसरणाºया धुळीच्या साम्राज्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कामाचे साहित्य रस्त्यावर तसेच पडून राहिल्याने मुख्य रस्त्याची अडवणूक झाली असून नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असून प्रत्येक नोडमधील अंतर्गत रस्ते, नागरी सुविधांच्या बाबतीत मात्र सिडकोने हात वर केले आहेत.
उलवे परिसरात ठिकठिकाणी उघडी गटारे पाहायला मिळतात. याकडे मात्र गांभीर्याने लक्ष न घातल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्याच महिन्यात या ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतरही सिडकोला जाग आली नसून अजूनही या गटारांवरील झाकणे उघडीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उघडे गटार, अस्वच्छ नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी रोगराईचे प्रमाण वाढले असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गटारांची साफसफाई केली जात नसल्याने पाणी रोडवरून वाहू लागले आहे.
नागरी आरोग्य
केंद्राचा गलथानपणा
दुपारच्या वेळी नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. डासांचा वाढता प्रादुर्भाव, अस्वच्छता, धुळीचे वाढते प्रमाण या साºयामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असून उपचाराकरिता केवळ एकच नागरी आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. दुपारच्या वेळी या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने जर एखादा रुग्ण उपचाराकरिता आल्यास काय करावे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.
नागरी आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचीही तक्रार नागरिकांनी नोंदविली. उलवे नोडमध्ये परवडणारी घरे उपलब्ध असल्याने चार वर्षांपासून अनेकांनी घरे खरेदी केली आहेत; परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरे बंद ठेवावी लागली आहेत. मानखुर्दवरून या ठिकाणी राहायला आलेल्या अनंत पाटील यांनी सिडकोच्या उदासीन काराभारावर नाराजी व्यक्त केली.
सिडको प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले असून येथील दैनंदिन जीवन त्रासदायक ठरत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी असल्याने या जमिनींवर अजूनही हक्क गाजवित असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.
उलवेत पायाभूत सुविधांची वानवा
गेली काही वर्षे आम्ही या ठिकाणी राहण्यास आलो; मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या ठिकाणी नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. या ठिकाणी अजूनही येण्या-जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. शहराचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोने उलवे नोड विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी राहणारे सर्वच नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत.
- अनंत पवार, रहिवासी
परिसरात बस
थांबाच नाही
नागरिकांना भर उन्हात तसेच पावसात ताटकळत राहावे लागते. अनेकदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येत नाही. बामणडोंगरी येथील रिक्षा थांब्याची दुरुस्ती न केल्याने या ठिकाणी रिक्षा उभ्या करता येत नाहीत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून काही ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
- रवींद्र नाईक, रिक्षाचालक
नागरिकांकडून स्वखर्चाने मैदानाची स्वच्छता
सेक्टर १९ परिसरातील मैदान विकसित झाले नसून स्थानिक खेळाडूंचा हिरमोड झाला आहे. मैदानाची जागा कधीच स्वच्छ केली जात नसून स्थानिक नागरिक स्वखर्चाने या ठिकाणी मैदान स्वच्छ करून वापरतात. यासंदर्भात सिडकोकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले
गेले नाही. दिवसेंदिवस या ठिकाणी समस्यांमध्ये वाढच होत असून नागरिकांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागत
आहे.
- आरती धुमाळ,
स्थानिक रहिवासी
भाजी मंडई नसल्याने अडचण
भाजी मंडई नसल्याने गृहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शॉपिंग क ॉम्प्लेक्समध्येच दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत असून फळे, भाजीपाल्याकरिता स्वतंत्र मंडई नसल्याने अनेक अडचणी येतात. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते.
- बीना शामंत, गृहिणी
खेळण्यासाठी जागाच नाही
दिवसेंदिवस समस्यांमध्ये वाढ होत असून अर्धवट कामामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नादुरुस्त फुटपाथ, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने रहिवासी संकुल परिसरातच खेळावे लागते. तसेच रस्त्यांची दुरवस्था झाली असून मुलांना सायकलचा वापर करता येत नाही.
- अनन्या मंडल, गृहिणी
>रस्त्यांची दुरवस्था
उलवे नोडमधील रस्त्याची स्थिती गंभीर आहे. मुख्य रस्त्याची स्थिती ठीक असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालविणे अशक्य होऊ लागले असून, वारंवार अपघात होऊ लागले आहेत. पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत.गटारांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. नोडमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनएमएमटीची बस वेळेत येत नसून बस थांबा नसल्याने भर उन्हात तसेच पावसात बसची वाट पाहण्यासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
>उद्यानाला टाळा
सेक्टर २ परिसरातील उद्यान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून काम पूर्ण झाल्यानंतरही उद्यान खुले न केल्याने संताप व्यक्त केला आहे. उलवे परिसरात खेळण्यसाठी मैदान, उद्यानांची कमतरता असून या ठिकाणी केवळ एकच उद्यान विकसित करण्यात आले. मात्र तेही बंदच असल्याचे दिसून आले.
उद्यानातील खेळाचे साहित्य या ठिकाणी लावण्यात आले असून वापराविना हे साहित्य खराब होईल याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवल्याने चिमुरड्यांना मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी नेता येत नसल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली.

Web Title: Infrastructural facilities in Ulway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.