कोकणवासीयांनो उद्योजक व्हा! दीपक केसरकर यांचा तरुणांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:38 AM2018-01-11T05:38:36+5:302018-01-11T05:38:50+5:30
कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
नवी मुंबई : कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ग्लोबल कोकण महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. तर येत्या काळात भातशेती लागवडीची जुनी पद्धत मोडीत काढून आरोग्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
कोकण आणि केरळची जडणघडण समान आहे. त्यानुसार केरळप्रमाणचे कोकणला विकसित करण्याचा प्रयत्न येत्या काळात सरकार करणार असल्याचे केसरकर यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. या दरम्यान उच्चशिक्षित तरुणांसह अल्पशिक्षितांच्याही रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये खादी ग्रामोद्योग, मँग्रोजमध्ये खेकडा पालन, नीरा उद्योगांसह इतर अनेक उद्योगांचा समावेश असेल. कोकणचा पर्यटन विकास केला जात असताना तिथे येणाºया पर्यटकांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात निवासाची गरज निर्माण होऊ शकते. याकरिता पर्यटकांच्या पसंतीची सर्वच वैशिष्टे लक्षात घेऊन आवश्यक तिथे हॉटेल्स, रिसॉर्ट तयार केली जाणार आहेत. त्याशिवाय हॉप आॅन हॉप आॅफ या ए.सी. बोटी उपलब्ध करून त्याद्वारे खाडीकिनारची गावे पर्यटकांसाठी खुली केली जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. तर पुढील सहा महिन्यांत कोकणमध्ये पंचतारांकित बोटीही उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले; परंतु या सर्व सुविधा दिल्या जात असताना त्या चालवणार कोण? असा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता कोकणातील तरुणांनी पुढाकार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भातशेतीसाठी चालत आलेल्या पद्धतीमुळे महिलांना पाठीचे आजार होत आहेत. हे टाळण्यासाठी तत्रज्ञानाचा वापर करण्याचेही त्यांनी सुचवले. अशा वेळी कोकणचे निसर्ग टिकून राहील व प्रदूषण होणार नाही, असे प्रकल्प कोकणात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
या वेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील प्रत्येक प्रकल्पाला राजकीय विरोध होत असल्याची खंत व्यक्त केली. तर ग्रिन रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे. यामुळे कोकणची नकारात्मकता जगभर पसरत आहे. तर ज्यांनी प्रकल्प पाहिलाही नाही, त्यांच्याकडून राखरांगोळीच्या टीका होत असल्याचा अप्रत्यक्ष टोला जठार यांनी उद्धव ठाकरे यांना मारला. त्यामुळे त्रयस्थ संस्थेने कोकणवासीयांना चांगल्या-वाईट गोष्टी सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच कोकणात आरोग्यसुविधा नसल्याने उपचारांसाठी गोवा अथवा मुंबईला जावे लागते. त्यामुळे शासनाने सुपरस्पेशलिटी रुग्णालय सुरू करून कोकणवासीयांना मोफत आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही ते म्हणाले.