जमीन हडपण्याचे भूमाफियांचे षड्यंत्र धुळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:53 AM2018-05-24T02:53:21+5:302018-05-24T02:53:21+5:30
अनधिकृत चाळींवर हातोडा : शासनाच्या ७० एकर भूखंडावर चाळींचे बांधकाम; पनवेल महापालिकेची सर्वात मोठी कारवाई
पनवेल : किरवली-अडिवली परिसरामध्ये सरकारी जमीन हडपण्याचे षड्यंत्र पनवेल महापालिकेने उधळवून लावले. ७० एकर भूखंडावर उभारण्यात आलेल्या चाळींवर कडक बंदोबस्तामध्ये बुलडोजर चालविण्यात आला. येथील २० चाळींमधील १२५पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त केली आहेत. पनवेल महापालिकेची ही सर्वात मोठी कारवाई असून, पुढील तीन दिवस मोहीम सुरू राहणार आहे.
राज्यातील सर्वात कमी झोपडपट्ट्या असलेल्या महापालिकांमध्ये पनवेलचा समावेश होतो; परंतु सद्यस्थितीमध्ये भूमाफियांनी या परिसरामध्येही अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तळोजा व शिळफाटा परिसराच्या बाजूला अतिक्रमणांचे प्रमाण वाढत आहे. किरवली परिसरामध्ये चक्क पक्क््या चाळींचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना देऊनही अनधिकृत गाळे व चाळी उभारण्याचे काम सुरूच होते. अखेर बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पालिकेचे कर्मचारी, दोन जेसीबी यांच्या साहाय्याने या अनधिकृत चाळी तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी काही जणांनी या कारवाईत हस्तक्षेपदेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिका अधिकाºयांनी ते न जुमानता कारवाई सुरूच ठेवली. विशेष म्हणजे, संबंधित चाळी बांधणारे व घरे विकत घेणारे परप्रांतीयच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या कारवाई दरम्यान ठाणे जिल्ह्यातील स्थानिक ग्रामस्थांनी मध्यस्ती करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तो प्रयत्न निष्फळ झाला. या ठिकाणी चाळी बांधण्यामागे एक रॅकेट सक्रि य असून, हा घोटाळा हजारो करोडोंच्या घरात जाऊ शकतो. या ठिकाणी असलेल्या ७० एकर शासनाच्या जागेची किंमत ही हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्याच्यावर घरे बांधण्याची परवानगी या भूमाफियांना कोणी दिली, हा प्रश्न या वेळी निर्माण झाला आहे. पालिकेत समाविष्ट २९ गावांचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नसल्याने, या ठिकाणच्या ग्रामस्थांना आपली घरे दुरुस्त करण्याची परवानगी नसताना पालिका हद्दीत एवढ्या मोठ्या संख्येने चाळी कशा काय बांधल्या जातात. याबाबत चौकशी करण्याची मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्तांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी आयुक्त गणेश देशमुख हे स्वत: या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासह उपायुक्त जमीर लेंगरेकर, गणेश साळवी, श्रीराम हजारे, भगवान पाटील, दौलत शिंदे, अनिल कोकरे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी
संबंधित जागा शासनाच्या मालकीची आहे तरीदेखील मोठ्या संख्येने या ठिकाणी चाळी व गाळे बांधण्याचा अधिकार या ठिकाणच्या भूमाफियांना कोणी दिला? एकीकडे प्रकल्पग्रस्तांच्या घरांना दुरु स्तीची परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे भूमाफियांनी घातलेले थैमान याबाबत चौकशी करण्याची यावी, अशी मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केली आहे.
बशीर पटेल कोण?
या कारवाईदरम्यान मुंब्रा येथील बशीर पटेल नावाचा इसम वारंवार कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत होता. गरिबांची घरे कशाला तोडता, असा तो वारंवार पालिकेच्या अधिकाºयांना सांगत होता. शासनाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून परप्रांतीय बशीर पटेल पालिकेच्या कारवाईत अडथळा कसा काय आणू शकतो? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
पोलिसांच्या बंदोबस्ताविना कारवाई
या कारवाईदरम्यान तळोजा पोलीस ठाण्याच्या मार्फत पोलीस बळ पुरविण्याची मागणी केली होती. मात्र, ऐन वेळेला इतर ठिकाणच्या बंदोबस्ताचे कारण देत पोलीस घटनास्थळी आलेच नाहीत. अशा वेळी पालिका कर्मचाºयांनी जीव मुठीत धरून या ठिकाणी कारवाई सुरूच ठेवली. या वेळी या ठिकाणच्या विरोध करणाºया नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाºयांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.