महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी रायगडमध्ये
By admin | Published: February 14, 2017 04:31 AM2017-02-14T04:31:58+5:302017-02-14T04:31:58+5:30
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी महाड-पोलादपूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. ग्राहकांना ही स्ट्रॉबेरी आकर्षित
अलिबाग : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी महाड-पोलादपूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. ग्राहकांना ही स्ट्रॉबेरी आकर्षित करत असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.
महाबळेश्वर येथे येणारे पर्यटक हे स्ट्रॉबेरीचे मोठे ग्राहक आहेतच, परंतु पर्यटकांची गर्दी ही केवळ शनिवार-रविवार सुटीच्या दिवशीच असते. उर्वरित दिवसांत स्ट्रॉबेरीचा बहर आल्यावर त्यांचा विक्रीभाव महाबळेश्वरमध्ये काहीसा कमी होतो. यावर मात करण्याकरिता अंबेनळी घाट उतरून शेतकरी आपल्या मळ््यातील स्ट्रॉबेरी विक्रीकरिता महाड-पोलादपूरच्या बाजारपेठेत घेवून येतात. या बाजारपेठेत त्यांना भाव देखील चांगला मिळतो, अशी माहिती महाबळेश्वरजवळच्या बिरमणी गावातील शेतकरी अण्णा घाडगे यांनी दिली.
सध्या स्ट्रॉबेरी १२० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. प्रारंभीचा हंगाम असल्याने सध्या स्ट्रॉबेरीचे हे फळ काहीसे आंबट आहे, मात्र ग्राहक ते हौसेने खरेदी करीत आहेत. होळीच्या सुमारास मागणी वाढते, अशी माहिती स्ट्रॉबेरी विक्रेत्यांकडून मिळाली.
गेल्या काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावात स्ट्रॉबेरीची
शेती करण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. परंतु काही काळातच ही शेती थांबविण्यात आली आहे. परिणामी आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची महाड-पोलादपूरकर वाट पहात असतात. (विशेष प्रतिनिधी)