एक हजाराहून अधिक स्पर्धकांचा महापौर चषक स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:08 AM2018-02-16T03:08:38+5:302018-02-16T03:08:52+5:30
नवी मुंबई : विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त बेलापूर येथील सेक्टर ३ मध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवी मुंबई महापौर चषक अॅथलेटिक्स स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन झाले.
दोन दिवसीय अॅथलॅटिक्स स्पर्धांमध्ये ५०, १००, २००, ४००, ८०० मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक, १०० बाय ४ रिले अशा विविध क्र ीडा प्रकारांचा समावेश असून ६, ८, १०, १२ व १४ वर्षांआतील वयोगटातील (मुले व मुली स्वतंत्र गट) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिकत असलेले तसेच ठाणे जिल्ह्यातील खुल्या गटातील एक हजारहून अधिक खेळाडू सहभागी झालेले आहेत.
स्पर्धेसाठी केलेला सराव, त्यासाठी घेतलेली मेहनत हे या स्पर्धेतून दिसून येत आहे, असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी केले. यावेळी बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका विविध स्पर्धांच्या आयोजनातून नवी मुंबईच्या खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत असून यामधून नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारे क्रीडापटू घडतील असा विश्वास व्यक्त केला. स्पर्धेत सहभागी खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही सूचना त्यांनी केली.
स्पर्धेचे निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समिती सभापती विशाल डोळस यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती कटिबध्द असल्याचे सांगत ही नवी वेबसाईट कार्यान्वित होत असून आता खेळाडूंना स्पर्धांविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, तसेच स्पर्धांमध्ये नावनोंदणीही वेबसाईटवर आॅनलाइन उपलब्ध होईल, अशी माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्यांना २ लाख ५० हजार रकमेची पारितोषिके वितरित करण्यात येणार असून १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता बक्षीस समारंभ होईल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस व उपसभापती रमेश डोळे आणि समिती सदस्य यांनी केले आहे. याप्रसंगी महापौरांसमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रवींद्र इथापे, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती विशाल डोळस, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती अनिता मानवतकर, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, गिरीश म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उपसचिव राजेंद्र मयेकर आदी उपस्थित होते.