मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण : नारायण राणेंच्या नीलेश फार्मला अभय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 03:00 AM2018-07-13T03:00:46+5:302018-07-13T03:01:13+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित झालेल्या नीलेश फार्मला अभय देण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित झालेल्या नीलेश फार्मला अभय देण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे. हे फार्महाउस माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मालकीचे असल्याने प्रशासनाने चालढकल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संतोष ठाकूर यांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांची पत्नी नीलम राणे यांची २१३० चौ.मी. जागा संपादित झाली आहे. संपादित जागेचा मोबदलाही राणे कुटुंबीयांना मिळाला असून, ही रक्कम जवळपास ८० लाखांच्या आसपास आहे. संबंधित जागेची भरपाई देऊनही या जागेला अभय देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. संपादित होऊन आणि मोबदला देऊनही रुंदीकरणात नीलेश फार्मची जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. या ठिकाणाहून रस्त्याला वळण देण्यात आलेले आहे. कर्नाळा परिसरात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर १३२० चौ.मी. वरकस जमीन महामार्गाकरिता संपादित केल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. याचबरोबर नारायण राणे यांची ८१० चौ.मी. जागा रुंदीकरणात गेल्याची कागदोपत्री नोंद आहे. वास्तविक, नीलेश फार्महाउसची संरक्षण भिंत आजही तशीच आहे. तारा गावातील अजय पाटील यांनी माहितीच्या अधिकारात हे उघड केले आहे. पाटील हे मुंबई-गोवा महामार्गबाधित आहेत. त्यांनी या संदर्भात पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.
दरम्यान, राणे यांनी या जागेचा मोबदला एप्रिल महिन्यात स्विकारल्याने भूसंपादनाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पेणच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.
हा प्रशासनाचा विषय
मुंबई-गोवा महामार्गालगत जवळपास ७० टक्के लोकांना भूसंपादनाची रक्कम मिळालेली आहे. फक्त राणेंना त्याचे पैसे मिळाले असे नाही. दोन वर्षांपूर्वी इथे मार्किंग करण्यात आले. तेव्हाही आम्ही रूंदीकरण किंवा संपादनाला विरोध केला नाही किंवा आक्षेपही घेतला नाही. आजही आमचा कसलाच विरोध नाही. संपादन का झाले नाही, कारवाई का झाली नाही, या प्रश्नांचे उत्तर तर प्रशासनच देऊ शकेल. आम्ही या प्रक्रियेत कधीच हस्तक्षेप केलेला नाही, अशी भूमिका नीलेश राणे यांनी मांडली.
मुंबई-गोवा महामार्गबाधित ग्रामस्थांची घरे त्वरित पाडण्यात आली. २०१५ मध्ये ग्रामस्थांना भूसंपादन कायद्याअंतर्गत मोबदला देण्यात आला. यामध्ये नारायण राणेंच्या नीलेश फार्मचाही समावेश असताना त्यांच्या फार्मला अभय का? सर्वसामान्यांना एक न्याय आणि नारायण राणेंना एक न्याय, असा कारभार सुरू आहे.
- संतोष ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते
खातेदाराचे नाव गट नं. एकूण क्षेत्रफळ नुकसान भरपाईची रक्कम
नीलम नारायण राणे १६७/१ १३२० चौ.मी ४३,३७,५५६
नारायण तातू राणे १६७/२ ८१० चौ.मी. ३६,७८,०१५