गोवर रूबेला लसीकरणाविषयी महापालिकेची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:31 AM2018-08-28T05:31:09+5:302018-08-28T05:31:54+5:30
डॉक्टरांची उपस्थिती : अभियान यशस्वी करण्याचा निर्धार
नवी मुंबई : महानगरपालिकेने गोवर रूबेला लसीकरणाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील बालरोगतज्ज्ञांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गोवर आणि रूबेला हे संक्र मक आजार असून याचा संसर्ग कुणालाच होऊ नये याविषयी खबरदारीसाठी भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा गोवर रूबेला लसीकरण कार्यक्र म २0१८ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपण सर्वांच्या सहयोगातून १00 टक्के यशस्वीरीत्या राबवू असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. गोवर रूबेला लसीकरण करण्यात यावे याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मागील ७ ते ८ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आता याविषयी सकारात्मक भूमिका घेत संपूर्ण देशभरातच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. गोवर, रुबेला लसीकरण मोहीमही ९ महिने ते १५ वर्षाआतील मुलांमध्ये यशस्वीरीतीने पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.
नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रूबेला लसीकरण हाती घेण्यात येऊन विशेषत्वाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये १0 वीपर्यंतच्या मुलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या महापालिकेच्या विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था, मंडळे यांच्या परस्पर सहयोगातून तसेच बालरोगतज्ज्ञ यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या मोहिमेविषयी माहिती व प्राथमिक स्वरूपाची चर्चा यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, डॉ. प्रशांत जवादे, डॉ. रत्नप्रभा चव्हाण, जागतिक आरोग्य संघटनेचे पर्यवेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण काटकर, डॉ. प्रतीक तांबे, डॉ. वंदना निकुंभ, विनय अडप्पा, लीना बजाज, अहमद कुरेशी उपस्थित होते.