सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल हवी; रेल्वे प्रवासी संघटनेने वेधले लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 08:16 AM2024-05-08T08:16:39+5:302024-05-08T08:16:52+5:30

उरणपर्यंत तयार केलेल्या मार्गाचे १२ जानेवारी रोजी उद्घाटन झाले. पूर्वी नेरूळ/बेलापूर ते खारकोपरदरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या त्यानंतर  उरणपर्यंत वाढविण्यात आल्या.

Need direct local between CSMT and Thane to Uran; Attention was drawn by the Railway Passengers Association | सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल हवी; रेल्वे प्रवासी संघटनेने वेधले लक्ष 

सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल हवी; रेल्वे प्रवासी संघटनेने वेधले लक्ष 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या प्रवाशांची आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठताना दमछाक होत आहे. विशेषत: ठाणे, उरण पट्ट्यात तर आजही लोकल प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा, यासाठी  सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.

उरणपर्यंत तयार केलेल्या मार्गाचे १२ जानेवारी रोजी उद्घाटन झाले. पूर्वी नेरूळ/बेलापूर ते खारकोपरदरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या त्यानंतर  उरणपर्यंत वाढविण्यात आल्या. या भागातील तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण या स्थानकांपर्यंत लोकल उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु, बेलापूर-नेरूळ  ते उरणदरम्यान सीएसएमटी व ठाण्याहून थेट उरणपर्यंत लोकल सेवा सुरू होणे गरजेचे आहे.  ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-नेरूळदरम्यान व हार्बर मार्गावर सीएसएमटी-बेलापूरदरम्यान लोकल  चालवल्या जातात. यापैकी काही ठाणे-नेरूळ  लोकलचा पुढे उरणपर्यंत विस्तार करण्याची, तर काही सीएसएमटी-बेलापूर लोकल नेरूळ-सीवूड दारावेनंतर उरणकडे वळविण्याची आवश्यकता आहे.

नीटनेटकी व्यवस्था
सीएसएमटी व ठाण्याहून ये-जा करणाऱ्या लोकल उरण मार्गावर वळविण्यासाठी नेरूळ स्थानकाजवळ आवश्यक ते सांधे (क्रॉसओव्हर) बसविलेले असल्याने, येथे रेल्वेमार्ग बदलण्याची सोय आहे. 
जानेवारीत खारकोपरच्या पुढे उरणपर्यंत लोकल सेवेचा विस्तार करताना, रेल्वे प्रशासनाने या सेक्शनवरील लोकलची पूर्वीची स्थिती बदलूून उरण ते सीएसएमटी/ ठाणे लोकल सुरू करण्यासाठी नीटनेटकी व्यवस्था केल्याने, सीएसएमटी / ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू कराव्यात.

‘लोकल बदलून अनेकांचा प्रवास’ 
उरणपर्यंत लोकल वाहतूक सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप या भागात नेरूळ व बेलापूरहून शटल स्वरूपात लोकल फेऱ्या चालविल्या जात असल्याने मुंबई महानगरातून या सेक्शनवर प्रवास करायला प्रवाशांना, सध्या वडाळा/ पनवेल/ दादर/ कुर्ला/ ठाणे/ नेरूळ/ बेलापूरपैकी दोन किंवा तीन ठिकाणी लोकल बदलून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांच्या सोईसाठी आता ठाणे ते उरण व सीएसएमटी ते उरण दरम्यान थेट लोकल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

अडचण येणार नाही
सीएसएमटी ते जुईनगर, ठाणे ते तुर्भे दरम्यानच्या स्थानकावर व नेरूळ स्टेशनातील फलाट क्रमांक १ ते वरील इंडिकेटरवर उरण लोकल  दर्शविण्याची तसेच उरण ते नेरूळ दरम्यानच्या स्थानकातील इंडिकेटरवर सीएसएमटी व ठाणे लोकल  दर्शविण्याची सोय केल्यास सीएसएमटी व ठाणे ते उरणदरम्यान थेट लोकल  फेऱ्या सुरू करण्यास अडचण येणार नाही.

पश्चिम रेल्वेवरील मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी येथून बसने प्रवासी ठाणे स्थानकात येतात. ट्रान्स हार्बरवरील दिघा ते तुर्भे दरम्यानच्या नवी मुंबईतील उपनगरांतून कर्मचारी न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू व अन्य पोर्टमध्ये, पोर्टशी संबंधित व्यवसायात, तरघरजवळ नवी मुंबईसाठी तयार केल्या जात असलेल्या नवीन विमानतळ बांधकामाच्या प्रकल्पात नोकरी/ व्यवसायानिमित्त ये-जा करीत असतात. त्यांना नीट प्रवास करता आला पाहिजे.
- नंदकुमार देशमुख, 
अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ

Web Title: Need direct local between CSMT and Thane to Uran; Attention was drawn by the Railway Passengers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल