बौद्धकालीन लेण्यांना ठरविले पांडवकालीन
By admin | Published: January 6, 2017 05:54 AM2017-01-06T05:54:50+5:302017-01-06T05:54:50+5:30
नवी मुंबइतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यातील नावीन्यतेसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत आहे. आता तेथील बहुचर्चित बौद्ध लेण्यांचे
आविष्कार देसाई, अलिबाग
नवी मुंबइतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यातील नावीन्यतेसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत आहे. आता तेथील बहुचर्चित बौद्ध लेण्यांचे (सध्याचे केरू माता मंदिर) रूपांतर पांडवकालीन लेण्यांत करण्याचा वेगवान निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बौद्धकालीन लेण्यांची नोंदणी चुकीची झाली आहे. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल तालुक्यातील उलवे गणेशपुरी वाघोलीवाडा येथे बौद्ध धर्मीयांची वस्ती आहे. त्यांच्या राहत्या घराच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर घालाव्यात, यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत; परंतु पनवेल प्रशासनातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथील वस्तीचा पंचनामा करण्यासाठी पुढे आला नाही.
वस्तीला लागूनच बौद्ध लेणी (सध्याचे केरूमाता मंदिर) आहेत. राज्य सरकारच्या पुरातन विभागाने बौद्ध लेणी अशी नोंद केल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पनवेलच्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचनामा केला; परंतु पंचनामा करताना तक्रारदाराला बोलवलेच नाही. पंचनामा करताना बौद्धकालीन लेण्यांना पांडवकालीन लेणी ठरवले. हा पंचनामा खोटा असल्याचा दावा सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने निवदेनात केला आहे. यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. महसूल प्रशासनाला वस्तीतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. त्याच प्रशासनाने बौद्धकालीन लेण्यांना पांडवकालीन ठरविण्यासाठी जलद कारवाई का केली? असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे. विमानतळासाठी सपाटी करणाचे काम सुरू असून त्याचे टेंडर हे सुमारे एक हजार ८०० कोटी रुपयांचे आहे.