शहरात पार्किंगची समस्या गंभीर; अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बेकायदा तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:50 AM2018-07-05T02:50:17+5:302018-07-05T02:50:26+5:30
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई : शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगअभावी वाटेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
वाहतूककोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातच वाहने पार्क करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याला नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता; परंतु त्यांची बदली होताच पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंग सुरू झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. कोपरी गावालगत पामबीच मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चक्क नो पार्किंगमध्ये वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. घणसोली रेल्वेस्थानक, बेलापूर-सीबीडी प्रभात सेंटर, करावे गाव महापालिका तलाव, वाशी सागर विहार चौपाटी, फोर्टीस हॉस्पिटलसमोरील रस्ता, जुहूगाव येथील गावदेवी मैदान, सीवूड रेल्वेस्टेशन, घणसोली आणि तुर्भे महापालिका विभाग कार्यालयाचा परिसर, नेरुळ रेल्वेस्टेशन, तुर्भे येथील जनता मार्केटजवळील उड्डाणपुलाच्या खालील परिसर, शिरवणे गावातील महापालिका शाळेचे मैदान, घणसोली डी-मार्ट परिसर, जुईनगर डी-मार्ट, कोपरखैरणे वैकुंठधाम स्मशानभूमी, तीन टाकी, वाशी गावातील भुयारी मार्गाबाहेर, ऐरोली सेंट झेवियर्स स्कूल, वाशी साईनाथ हायस्कूल, महापालिका प्रथम संदर्भ रु ग्णालय, रबाळे पोलीस स्टेशन परिसर, घणसोली रिलायन्स कंपनी समोरील सर्व्हिस रोड, तसेच कोपरखैरणे बालाजी टॉवर समोरील रस्त्यावर
दोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग दिसून येते.
या बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक नियोजन ढासळले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. अनेक ठिकाणी थेट पदपथावर वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
अनेक विभागांत रस्त्यांच्या कडेला ट्रक, कंटेनर व शाळेच्या बस उभ्या केलेल्या दिसून येतात. त्याकडे संबंधित विभागाचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
पे अॅण्ड पार्क : बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली आणि कोपरखैरणे विभागात एकूण १२ ठिकाणी पे अॅण्ड पार्क आहे, तर बेलापूर ते ऐरोली दरम्यान एकूण
५२ वाहनतळ असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.
पार्किंगची प्रमुख समस्या आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येनुसार सिडको आणि महापालिकेने वाहन पार्किंगचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रसंगी मल्टिलेवट अर्थात बहुमजली पार्किंग तळाचाही प्रयोग करणे आवश्यक आहे, असे असले तरी वाहनधारकांनी उपलब्ध सुविधांचा वापर करताना नियोजनाला तडा जाणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
- नितीन पवार,
पोलीस उपायुक्त,
वाहतूक शाखा