महोत्सवातून उलगडला संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:43 AM2017-12-28T02:43:23+5:302017-12-28T02:43:44+5:30
कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये मंगळवारी वातावरण भक्तिमय झाले होते.
कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये मंगळवारी वातावरण भक्तिमय झाले होते. निमित्त होते नृत्यनाटिकेच्या आधारे संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कार्यक्र म. ४४ कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करीत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र उलगडले. दोन तास चाललेल्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्र मात सर्व जण लीन आणि तल्लीन झाले होते. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.
पारंपरिक पद्धतीने सुरू झालेल्या या महोत्सवात विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले; परंतु मंगळवारी काही औरच कलाविष्कार सादर झाला. सुप्रसिद्ध नर्तिका सोनिया परचुरे प्रस्तृत नृत्यनाटिका फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरले. संताची महती तरुण पिढीला करून देण्याचे काम सोनिया परचुरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई यांचा जन्म या नाटिकेच्या माध्यमातून दाखविण्यात आला. त्याचबरोबर लहानपणी या चार भावंडांना झालेल्या वेदनांच्या चित्रणाने डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकणारा क्षण हृदयाला हेलवणारा होता. सन्यांशाची पोरं म्हणून त्यांची समाजाकडून जी अवहेलना झाली त्याचे हुबेहूब चित्रण करण्यात आले होते. हा क्षण अनेकांच्या मनात त्या काळातील समाज व्यवस्थेबाबत चीड निर्माण करीत होता. त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणारे ज्ञानेश्वर पनवेलकरांना दिसले, त्या वेळी सर्व जण भाऊक मुद्रेने नृत्यनाटिका पाहत होते.
माजी आमदार विवेक पाटील, शिक्षक आमदार बाळाराम पाटील, शंकर म्हात्रे, वीणा वर्ल्ड ट्रॅव्हॅल्सच्या वीणा पाटील, सुधीर पाटील, या वेळी प्रोजेक्ट चेअरमन संतोष अंबावने सचिव निखील मनोहर, सूर्यकांत कुल्हे, रमेश भोळे, डॉ. दीपक पुरोहित, मिलिंद पर्वते उपस्थित होते. या वर्षाचे आयोजन चांगले असून व्यासपीठही चांगले आहे. पनवेलच्या नावलैैकिकात भर टाकणाºया रोटरी फेस्टिव्हलचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.
>कथ्थक नृत्यांचीही छाप
मंगळवारी इंडियन क्लासिक कथ्थक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. ‘मुरली मनोहर कृष्ण कन्हैया’ या गीताने कार्यक्र माची सुरुवात झाली. त्यामध्ये आठ नर्तिकांनी सादरीकरण केले. ‘सुरई आँखयो मे’ या गीतावर सादर करण्यात आलेल्या नृत्यात आईबरोबरच वडीलही तितकेच आपल्या बाळाला जीव लावतात, याचे चित्रण करण्यात आले. ‘नैन सो नैन नही मिला’, ‘निज माझ्या नंदलाला’, ‘तराना’ या गीतांवर सादर केलेल्या नृत्यांना वाहवा मिळाली.
>फेस्टिव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोटरी फेस्टिव्हलला पनवेलसह सिडको वसाहती, ठाणे, नवी मुंबईतून रसिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. सांस्कृतिक कार्यक्र मांची मेजवाणी, उत्तम नियोजन, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आदी विविध वैशिष्ट्ये या फेस्टिव्हलची आहेत. ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत पासेस देण्यात आले आहेत. महोत्सावातून मिळालेल्या निधीचा वापर सामाजिक उपक्र माकरिता केला जात असल्याचे प्रोजेक्ट चेअरमन संतोष अंबावने यांनी सांगितले.