सीरियल रेपिस्ट : कुरेशीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढताच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:06 AM2018-10-02T03:06:17+5:302018-10-02T04:11:18+5:30

खारघर व ओशिवरा येथील दोन घटना उघड

Serial Respist: Qureshi's crime rate increases | सीरियल रेपिस्ट : कुरेशीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढताच

सीरियल रेपिस्ट : कुरेशीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढताच

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी (३४) याने कबूल केलेल्या गुन्ह्यात दोनने वाढ झाली आहे. खारघर व ओशिवरा या ठिकाणचे हे दोन गुन्हे आहेत. दरम्यान, संधी मिळेल त्या वेळी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अथवा अत्याचाराचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याने त्याच्यावरील पॉक्सोच्या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहान कुरेशी (३४) याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला आहे. सुरुवातीला त्याने पंधरा गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर अधिक तपासात त्याने केलेले इतर दोन गुन्हे समोर आले आहेत. ओशिवरा व खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल आहे. यादरम्यान पोलिसांच्या चौकशीत त्याने संधी मिळेल त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अथवा अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. ज्या मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न झाला असेल, अशा पालकांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळल्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व घटना समोर आल्यास रेहानवर अनेक पॉक्सोचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांकडून रेहानकडून असे गुन्हे घडले असावेत हे मान्य केले जात नाही. तळोजा येथील पॉक्सोच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याची कल्पना असतानाही कुटुंबीयांकडून तो लपवण्यात आला होता.

वीस वर्षांपूर्वी परेल येथे रेहानचे कुटुंब राहायला होते. मटणाच्या दुकानाचा व्यवसाय बंद करून चमड्याच्या व्यवसायात उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या वडिलांची लखनऊ येथे हत्या झाली. तेव्हापासून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी रेहानची आई व मोठ्या भावावर आहे. त्यानंतर काही वर्षांतच ते सर्व जण नवी मुंबईत ओवे गाव येथे राहायला आले. या वेळी २०१५ मध्ये रेहानने आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने त्याला अटक झाली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक गुन्हे करण्यास सुरुवात केली असावी. मात्र, पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच सुमारे चार महिन्यांपूर्वी सर्व जण मीरा रोडला राहायला गेल्याने, रेहानच्या कृत्यांची माहिती त्याच्या कुटुंबीयांनाही असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Web Title: Serial Respist: Qureshi's crime rate increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.