नवी मुंबई भागवणार पनवेलकरांची तहान, दररोज देणार ५0 टँकर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:38 AM2018-04-09T02:38:28+5:302018-04-09T02:38:28+5:30

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळेच पनवेल शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Thane Thanjavur will provide 50 tankers of water every day | नवी मुंबई भागवणार पनवेलकरांची तहान, दररोज देणार ५0 टँकर पाणी

नवी मुंबई भागवणार पनवेलकरांची तहान, दररोज देणार ५0 टँकर पाणी

googlenewsNext

- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळेच पनवेल शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. शहरातील या समस्येसंदर्भात शेकाप व मित्रपक्षाने नवी मुंबई पालिकेकडे मदतीचा हात मागितला होता. त्याला प्रतिसाद देत दिवसाला पाण्याचे ५0 टँकर देण्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मान्य केले आहे.
महापालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेकाप महाआघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली. यावेळी पनवेलमधील पाण्याच्या समस्येसंदर्भात महापौर सुतार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार पनवेल महापालिकेला दररोज पाण्याचे ५0 टँकर देण्याचे आश्वासन महापौर सुतार यांनी शिष्टमंडळाला दिले. विशेष म्हणजे पनवेल पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने येत्या २0 एप्रिल रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या सभेत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी महाआघाडीच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले. पनवेलमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील पनवेल शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात माजी मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली होती. नवी मुंबई महापालिकेने पनवेल शहराला पाणीपुरवठा करावा, अशी विनंती आयुक्त डॉ. शिंदे यांनी नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर रविवारी पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षाच्या महाआघाडीच्या शिष्टमंडळाने महापौर जयवंत सुतार यांची भेट घेवून पनवेलच्या पाणीटंचाईवर सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यामुळे पनवेलला मिळणाऱ्या पाण्यावरून येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांत श्रेयवादाचा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या शिष्टमंडळात शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, तालुका अध्यक्ष सुदाम पाटील, गणेश कडू , अशोक शेळके, सुनील घरत आदींचा समावेश होता.
पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपीचा पाणीपुरवठा होतो. सिडकोच्या माध्यमातून खारघरला दररोज ७0 एमएलडी पाण्याची गरज असते. त्यापैकी सध्या ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तसेच कळंबोली नोडला प्रतिदिनी ४३ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ३८ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. कामोठे नोडला ३८ एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ३५ तर नवीन पनवेलला ४२ पैकी ३८ एमएलडी दररोज पाणीपुरवठा केला जातो. पनवेलला ३0 एमएमएलडीपैकी २८ तर ग्रामीण भागात दररोज २0 एमएलडी पाण्याची गरज असताना फक्त १0 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाºया देहरंग धरणाचा पाणीसाठाही कमी होत चालला आहे.
नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिकेला दररोज ५0 टँकर पाणी देणार आहे. परंतु पाण्यासाठी टँकर पनवेल महापालिकेचे असणार आहेत. त्यासाठी लागणारा खर्च पनवेल महापालिकेला उचलावा लागणार आहे.पालिका क्षेत्रात अपुरा पाणी साठा लक्षात घेता पालिका प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र सत्ताधाºयांनी त्या गोष्टीला विरोध केला. या दरम्यान पाण्याची उपाययोजना झाली नसल्याने आप्पासाहेब वेदक धरणातील पाणी साठा संपुष्टात आला. शेवटी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पत्र पाणीपुरवठा सभापतींनी आयुक्तांना दिले. मात्र उशीर झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाºया धरणाचा पाणी साठा संपुष्टात आला. आयुक्तांना विरोध म्हणून भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे आज शहरवासीयांवर पाण्याचे संकट आले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला आहे.
शेकाप शिष्टमंडळाने आमची भेट घेतली होती. यामध्ये आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा समावेश होता. पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्याची विनंती त्यांनी केली होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी देखील आमच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेला दररोज पाण्याचे ५0 टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे.
- जयवंत सुतार, महापौर,
नवी मुंबई सत्ताधारी भाजपाचे महापौर व आमदार अद्याप धरणाची पाहणी करीत आहेत. ही दिखावेगिरी आहे. शेकाप महाआघाडी सतत शहराला जादा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. त्यासाठी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी दिवसाला ५0 टँकर पाणी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पनवेलमधील पाणीटंचाईतून काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते, पनवेल महापालिकानवी मुंबई महापालिकेच्या महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आहे. पनवेल महापालिकेला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात जलवाहिनीद्वारे नवी मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली जाणार आहे.
- नीलेश बाविस्कर, सभापती, पाणीपुरवठा समिती, पनवेल महापालिका

Web Title: Thane Thanjavur will provide 50 tankers of water every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.