सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग पाण्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:34 AM2018-06-20T02:34:19+5:302018-06-20T02:34:19+5:30
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत.
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे त्याचा तीन वर्षांनंतरही वापर सुरू झालेला नाही. या कारणाने कळंबोली-कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. बी.ओ.टी. तत्त्वावर सायन-पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार २३ कि.मी. लांबीचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. परंतु बहुतांशी काम बाकी असताना शासनाने या कंपनीला टोल वसुली करण्यास परवानगी दिली. कळंबोली, कामोठे, पुरुषार्थ पेट्रोलपंप येथे बांधण्यात आलेले तीन सबवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. टोल सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. आता हे मार्ग बांधून पूर्ण झाले असले तरी आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांकरिता हे भुयारी मार्ग खुले करण्यात आलेले नाहीत. यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीतून येणाऱ्या- जाणाºयांना महामार्ग क्र ॉस करावा लागत आहे. भरधाव वेगाने येणाºया वाहनांमुळे अनेकदा लहान- मोठे अपघात घडतात, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. भुयारी मार्ग पाण्यात बुडून ठेवले आहेत त्याबाबत हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे सायन-पनवेल टोलवेज कंपनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडत आहे. तीनही ठिकाणी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत सर्व्हिस रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. या विरोधात आंदोलन झाले त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र तरीही कामोठे वसाहतीतून आजही मुंबई बाजूकडे जाता येत नाही. त्यासाठी दोन कि.मी. वळसा घालावा लागत आहे. त्यात सबवे बांधून फक्त शोभेपुरते ठेवण्यात आलेले आहेत. त्याचा वापर कळंबोली आणि कामोठेकरांना करता येत नाही. याबाबत कार्यवाही होत नसल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.
>सामाजिक संस्थेचाही पाठपुरावा
कामोठे येथील सबवे बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. महिला, मुले त्याचबरोबर ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. रिक्षावाले अडून बसतात त्यामुळे खिशाला मोठा भुर्दंड बसतो. मात्र, सा. बां. विभाग झोपेचे सोंग करीत असल्याचा आरोप अस्मिता सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा अॅड. सुलक्षणा जगदाळे यांनी केला आहे. आम्ही महिला या विभागाला अल्टिमेटम देणार आहोत. त्या कालावधीत किमान कामोठ्याचा सबवे सुरू झाला नाही तर महिलांचे अनोेखे आंदोलन करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधू, असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.
>सबवे अद्याप वापराकरिता खुले झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आतमध्ये पाणी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या कामाकरिता लवकरच निविदा काढण्यात येणार त्यानंतर ठेकेदार नियुक्त करून सबवे खुले करण्यात येतील.
- एस. व्ही. अलगुट,
उपअभियंता, सा.बा.विभाग.