अर्जुन अवॉर्डी काका पवार यांनी घेतला आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचा वसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:38 PM2017-09-28T21:38:29+5:302017-09-28T21:39:05+5:30

अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका पवार मात्र या सर्वांपेक्षा अनोखा ठरला आहे.

Arjun Avardi Kaka Pawar took fat to create an Olympic medal | अर्जुन अवॉर्डी काका पवार यांनी घेतला आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचा वसा

अर्जुन अवॉर्डी काका पवार यांनी घेतला आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचा वसा

Next

 औरंगाबाद - अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका पवार मात्र या सर्वांपेक्षा अनोखा ठरला आहे. मराठवाड्याचा असतानाही पुणे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारून अनेक आंतरराष्ट्रीय पहिलवान घडविणाºया काका पवार यांनी देशासाठी आॅलिम्पियन घडविण्याचा वसाच जणू घेतला आहे.
काका पवार हे रुस्तुमे हिंद आणि प्रतिष्ठित असा ध्यानचंद पुरस्कारप्राप्त हरिश्चंद्र बिराजदार यांचे शिष्य. बिराजदार यांनी मराठवाड्यातील पहिला अर्जुन पुरस्कार विजेता व दोनदा शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या काका पवार यांच्यासह राहुल आवारेसारखा प्रतिभावान पहिलवान देशाला दिला. गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांचे काका पवार आणि राहुल आवारे हे महाराष्ट्राचे मल्ल आॅलिम्पिकमध्ये खेळावे हे स्वप्न; परंतु अनेक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदके जिंकल्यानंतरही त्या वेळेस जास्त पक्षपाती धोरणामुळे काका पवार यांनी पहिलवानकी सोडून प्रशिक्षकाची भूमिका अवलंबिली. त्यामुळे बिराजदार यांच्या सर्व आशा या राहुल आवारेवर होत्या; परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते जग सोडून निघून गेले, याची खंत काका पवार यांच्या मनात खोलवर रुजली आहे. त्यामुळे आपल्या गुरूंचे स्वप्न पूर्ण करायचेच हा ध्यास आता काका पवार यांचा आहे. त्यामुळे राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांना आॅलिम्पियन पहिलवान करायचेच असा निर्धार काकांचा आहे. त्यासाठी या दोघांकडूनही ते खूप मेहनत करून घेत आहेत. कुस्तीने प्रतिष्ठा दिली आणि समाजात ओळख निर्माण करून दिली. कुस्ती या खेळाचे आपणही काही देणे आहे, या भावनेने काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्याचा निश्चय केला आणि २००४ साली त्यासाठी पुणे येथे कात्रजजवळ जमीनही घेतली. त्यानंतर २६ हजार स्क्वेअर फूट जागेत प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला आकार आला २००९ साली.
संकुल उभारताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु काका पवार यांनी हे संकुल पूर्ण केले. या वेळेस अनेकांनीही त्यांना सढळ हाताने मदत केल्याचे स्वत: काका पवार सांगतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ३0 बाय ३२ फूट आकाराचा लाल मातीचा आखाडा हे या आंतरराष्ट्रीय संकुल कुस्ती केंद्राचे वैशिष्ट्य. त्यामुळे पारंपरिक कला जपतानाच त्यावर सरावाने शक्तीचा अंदाज येतो आणि पकड मजबूत होते, असे काका पवार यांना वाटते. विद्यमान परिस्थितीत काका पवार यांच्याकडे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जवळपास १० वर्षांच्या या लहान वयोगटासह २७० पहिलवान मल्लविद्येचे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वच मल्लांना एकाच छताखाली म्हणजे कुस्ती केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वच मल्ल स्वत:चा आहार स्वत:च करून घेत असतात. त्यामुळे या संकुलात स्वावलंबनाचे धडे देण्याचे कार्यही काका पवार करीत आहेत.
विशेष म्हणजे या महागाईच्या काळातदेखील या कुस्ती केंद्रात मल्लांचे नाममात्र वार्षिक शुल्क असते. त्यात संकुलाचा दुरुस्ती खर्चही निघत नाही; परंतु काका याचा जास्त विचार करीत नाहीत. त्यांचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे आॅलिम्पियन मल्ल घडविण्याचे. या कुस्ती संकुलात अत्याधुनिकतेलाही जास्त महत्त्व असून, मल्लांच्या कुस्ती खेळताना त्यांच्याकडून होणाºया चुका या व्हिडिओतून पाहून त्याचे विश्लेषण केले जाते व मल्लांच्या चुका सुधारण्यात येत आहेत. या संकुलात काका पवार यांच्यासह गोविंद पवार, भारतीय कुस्ती संघाचे माजी प्रशिक्षक रणधीरसिंग, सुनील लिमन, प्रकाश घोरपडे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करीत असतात. सध्या काका पवार यांच्याकडे जागतिक आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेता राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांच्यासह सौरभ इंगळे, गणेश जगताप, विकास जाधव, ज्ञानेश्वर गोचडे, किरण भगत, कौतुक ढापले, शिवराज राक्षे, अतुल पाटील, योगेश पवार आदी दर्जेदार पहिलवान सराव करीत आहेत. कमी वेळेतच काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कुस्ती केंद्राने आतापर्यंत विविध वयोगटात २५ आंतरराष्ट्रीय पहिलवान देशाला दिले आहेत. सध्या हे कुस्ती केंद्र अद्ययावत होण्याच्या दृष्टीने स्टीम बाथ, सोनाबाथ, रिलॅक्सशनसाठी थंड पाण्याचा टब आदींचे जवळपास २५ लाख रुपयांचे काम या संकुलात सुरू आहे. हे कुस्ती केंद्र चालवणे हे मोठे आव्हानच आहे; परंतु हे आव्हान काका पवार दानशूर व्यक्तींच्या मदतीने यशस्वीपणे पेलत आहेत.

Web Title: Arjun Avardi Kaka Pawar took fat to create an Olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा