Asian Games 2018: ...अन्यथा ऑलिम्पिकमधून कुस्तीपटू रित्या हाताने परततील!
By प्रसाद लाड | Published: September 2, 2018 12:01 PM2018-09-02T12:01:20+5:302018-09-02T12:01:46+5:30
Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता.
- प्रसाद लाड
इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. पण भारताला पहिलाच धक्का सुशील कुमारच्या रुपात बसला आणि भारतीयांच्या आशा मावळल्या.
आशियाई स्पर्धेपूर्वी सुशीलच्या नावाचा चांगलाच दबदबा होता. या स्पर्धेपूर्वी तो एक लढत हरला होता. भारताबाहेर सराव करत असल्याने त्याचा खेळ चांगलाच बहरला असेल, असे वाटत होते. पण सुशीलच्या नावाचा फुगा पहिल्याच लढतीत फुटला. हा भारतासाठी मोठा धक्का होता.
साक्षी मलिक. ऑलिम्पिक पदक विजेती. आशियाई स्पर्धेत ती सुवर्णपदक पटकावणार, असा अतिआत्मविश्वास बऱ्याच जणांना होता. साक्षीने सुरुवातीला चांगली लढत दिली खरी, पण तिला कामगिरीत यश राखता आले नाही. त्यामुळे भारताला अजून एका पदकाला मुकावे लागले.
भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली ती कुस्तीनेच. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. त्यानंतर विनेश फोगटने भारताला सुवर्ण यश मिळवून दिले. पण त्यानंतर मात्र भारतीय कुस्तीमध्ये सोनेरी दिवस उगवला नाही. कारण त्यानंतर भारतीय कुस्तीपटूंनी एकामागोमाग पराभवाचाच पाढा वाचला. दिव्या काकरानने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले खरे, पण एकंदरीत कुस्तीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.
आता भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक असेल. त्यासाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. पण आतापासूनच योग्य पावले उचलली तर ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीमध्ये चांगली कामगिरी दिसू शकते. त्यासाठी काहीव कडक पावलेही उचलायला हवीत, अन्यथा ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रीत्या हाताने भारताला परतावे लागेल.