बॅडमिंटनपटू के. श्रीकांत सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये
By admin | Published: June 29, 2017 07:06 PM2017-06-29T19:06:16+5:302017-06-29T19:06:16+5:30
जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे. आधी इंडोनेशियन ओपन आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्र मवारीत श्रीकांतने सर्वोत्तम दहा खेळाडूंच्या यादीत प्रवेश केलाय. नवीन क्रमवारीनुसार किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानावर विराजमान आहे. गुंटूरच्या या २४ वर्षांच्या खेळाडूचे आता ५८,५८३ इतके गुण झाले.
२०१५ साली श्रीकांत जागतिक क्र मवारीत तिसऱ्या क्र मांकावर होता. मात्र त्यानंतर श्रीकांतचा फॉर्म हरवल्यामुळे त्याची घसरण झाली. मात्र लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित श्रीकांतने सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन केले आहे. श्रीकांतला आता अव्वल स्थानाचे वेध लागले आहेत.
श्रीकांतसोबत आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा साईप्रणित १५व्या व्या तर अजय जयराम १६ व्या स्थानावर पोहचला आहे. मात्र एच.एस. प्रणय २३ व्या स्थानावर घसरला. याव्यतिरिक्त सायना नेहवालही जागतिक क्र मवारीत एका स्थानाने पुढे जात पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे. दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहिलेल्या सायनाच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली होती. श्रीकांतच्या या कामगिरीबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ५० लाखांचे बक्षीस घोषित करीत राज्य शासनाच्या सेवेत क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याचे पदही बहाल केले आहे. सोबतच श्रीकांतला प्रशिक्षण देणारे
राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचाही आंध्र प्रदेश सरकारने १५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला.