दिल्लीचा दुष्यंत पहिलवान अव्वल, काटा कुस्ती दंगल, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:27 AM2017-11-27T01:27:23+5:302017-11-27T01:27:59+5:30
शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती.
यवतमाळ : शनिवार रात्री ११.४५ ची वेळ. अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी. दोन तरणेबांड मल्ल हनुमान आखाड्याच्या हौदात एकमेकांशी दोन हात करीत होते. दिल्लीचा दुष्यंत पहिलवान आणि मराठमोळा कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ यांच्यात चुरस सुरू होती. हलगी आणि तुतारीचा रणभेदी आवाज मल्लांसोबतच प्रेक्षकांचेही स्फुरण चढवीत होते. परंपरागत ‘मुलतानी’ व ‘बांगडी’ डाव पडला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली.
प्रेक्षक जागेवर उभे झाले. कोण जिंकणार अशी उत्सुकता लागली आणि तेवढ्यातच विजेच्या चपळाईने दुष्यंत पहिलवानाने एकेरी पट काढून श्रीपती पहिलवानाला आसमान दाखविले. काट्या कुस्त्याच्या दंगलीत दिल्लीच्या दुष्यंत पहिलवानाने ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकाविले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या हौदात काट्या कुस्त्यांच्या दंगलीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, हनुमान आखाड्याचे कंट्रोलर, माजी खासदार विजय दर्डा, एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, हनुमान आखाड्याचे मॅनेजर माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कुस्तीगीर संघाने काटा कुस्त्याच्या विराट दंगलीचे आयोजन केले होते. या स्पर्धेत दिल्ली, भिलाई, जबलपूर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, हिंगोली, वर्धा, अकोला यांसह राज्याच्या विविध भागांतून ४०० ते ५०० मल्ल सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यात अव्वल ठरलेला दिल्लीचा दुष्यंत पहिलवान याला प्रशांत बाजोरियातर्फे प्रायोजित ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, दीपक ठाकूर, विलास महाजन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. ४१ हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार दिल्लीचा कुलदीप पहिलवान याने पटकाविला. या दंगलीत तिसºया क्रमांकाची कुस्ती काट्याची झाली. सुहास घाडगे पुणे विरुद्ध गजानन पहिलवान देवठाणा यांच्यात ही कुस्ती रंगली. पराभूत पहिलवान गजाननने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत दहा मिनिटे हौद सोडला नाही. गुणाच्या आधारावर सुहास पहिलवान याला विजयी करण्यात आले. त्याला ३१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रुपयांचे चौथे बक्षीस ऋषिकेश पहिलवान यांनी पटकाविले. पाचवा क्रमांक हिंगोलीच्या रामदास पहिलवानाने, सहावा क्रमांक दिगंबर पहिलवान (हिंगोली), सातवा क्रमांक श्रीराम पहिलवान (पुणे), आठव्या क्रमांकाची कुस्ती शेख नबीब (औरंगाबाद) याने जिंकली. नववा क्रमांक हरिंदर पहिलवान (दिल्ली), दहावा क्रमांक गणेश पहिलवान (हिंगोली) व अकरावा क्रमांक शंकर पहिलवान (यवतमाळ) यांनी पटकाविला.
स्पर्धेदरम्यान माजी खासदार विजय दर्डा, हनुमान आखाड्याचे संचालक किशोर दर्डा यांनी भेट देऊन खेळाडूंचे मनोबल वाढविले. पंच म्हणून अनिल पांडे, महंमद शकील, उद्धव बाकडे यांनी कामगिरी केली. कुस्तीचे धावते समालोचन अरुण जाधव यांनी केले.