Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:24 PM2024-05-16T12:24:04+5:302024-05-16T12:25:38+5:30
Sunil Chhetri News : भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीयफुटबॉलचा चेहरा अर्थात सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. छेत्रीची निवृत्ती म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच. भारतीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुनील छेत्रीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा असेल. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.
सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताना एक भावनिक पोस्ट केली. या पोस्टवर भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. "माझा भाऊ, तुझा अभिमान वाटतो", असे विराटने म्हटले आहे.
Virat Kohli's comment on Sunil Chhetri's retirement post. 🇮🇳 pic.twitter.com/Qtm6X0PpQl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 16, 2024
सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल यात शंका नाही. सुनिल छेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने निवृत्तीची घोषणा केली. सुनील छेत्रीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. ३९ वर्षीय छेत्रीने २० वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी १५० सामने खेळले आणि ९४ गोल केले.
दरम्यान, सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओत तो भावूक झाल्याचे दिसते. निवृत्तीच्यावेळी त्याला त्याच्या पदार्पणाच्या सामन्याची आठवण झाली. यावेळी त्याने प्रशिक्षकांची आठवण काढली. सर्वांचे आभार मानत भारतीय दिग्गजाने फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.