भारतीय मुलींचा युवा रग्बी संघ सज्ज
By admin | Published: July 5, 2017 04:03 AM2017-07-05T04:03:23+5:302017-07-05T04:03:23+5:30
पॅरिस येथे ७ जुलैपासून सुरु होत असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघाची घोषणा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॅरिस येथे ७ जुलैपासून सुरु होत असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघाची घोषणा करण्यात आली. ओडिशाच्या सुमित्रा नायक हिच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून या संघात गार्गी वालेकर ही एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताचा हा युवा संघ सहभागी होत आहे.
याआधी यूएईमध्ये झालेल्या पहिल्या १८ वर्षांखालील रग्बी सेवेंस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या या युवा संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.
जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या भारताच्या युवा रग्बी संघात ओडिशा व पश्चिम बंगालचे वर्चस्व असून त्यांचे प्रत्येकी ५ खेळाडू संघात आहेत. महाराष्ट्र व दिल्लीचे प्रत्येकी एक खेळाडू संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.
‘जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी रग्बी संघ निवडीसाठी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये देशभरातून अव्वल २५ मुलींनी सहभाग घेतला होता. यामधून आम्ही १२ कसलेल्या मुलींची भारतीय संघात निवड केली,’ अशी माहिती संघाचे प्रशिक्षक नासिर हुसैन यांनी दिली.
जागतिक क्रीडा स्पर्धेत रग्बी व्यतिरिक्त व्हॉलिबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि हँडबॉल या स्पर्धाही रंगणार आहेत. ६० हून अधिक देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सुमारे १५ हजार हून अधिक खेळाडू आपले कौशल्य दाखवतील.
भारताचा युवा रग्बी संघ : सुमित्रा नायक (कर्णधार), बसंती पांगी, रजनी साबर, लिजा सरदार (सर्व ओडिशा), रिमा ओराओन, लचमी ओराओन, पुनम ओराओन, संध्या राय, सुमन ओराओन (सर्व पश्चिम बंगाल), गार्गी वालेकर (महाराष्ट्र) आणि सुलताना (दिल्ली).
मी दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. तरी, थोडे दडपण आहेच. युरोपियन आणि अमेरिकन संघाकडून आम्हाला कडवी लढत मिळेल. या स्पर्धेसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आमच्या खेळातील वेग ही आमची ताकद आहे. आखलेल्या योजनांनुसार खेळ करण्यात यशस्वी ठरलो, तर आम्ही पदक मिळवण्यात नक्की यशस्वी होऊ.
- गार्गी वालेकर
महाराष्ट्राची गार्गी..
गार्गी वालेकर मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी आहे.
सेंट मेरी शाळेत सहावीमध्ये असताना रग्बीची ओळख.
रुपारेल कॉलेजमध्ये एफवायबीएचे शिक्षण सुरु आहे.
शिबीरामध्ये तीन वेळा सराव,
तर इतरवेळी आठवड्यांतून दोनवेळा सराव.
दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड.