नरसिंग यादव निर्दोष आहे - भारतीय कुस्ती महासंघ
By admin | Published: July 25, 2016 01:24 PM2016-07-25T13:24:51+5:302016-07-25T13:27:08+5:30
नरसिंगला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंग यादवचे समर्थन केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - नरसिंग यादव निर्दोष असून, त्याच्यावर अन्याय झाला आहे. नरसिंगला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंग यादवचे समर्थन केले आहे. नरसिंगवर आमचा विश्वास आहे तो निर्दोष आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण सरण यांनी केली आहे.
७४ किलो फ्री स्टाईल वजनी गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग यादव रविवारी उत्तजेक सेवन चाचणीत दोषी आढळला. नरसिंगने उत्तेजक सेवनाचा आरोप फेटाळून लावत आपल्या विरोधात कारस्थान रचल्याचा दावा केला होता. भारतीय कुस्ती महासंघानेही नरसिंगचे समर्थन केले आहे. नरसिंग रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करेल ही आशा सोडलेली नाही असे ब्रिज भूषण सरण यांनी सांगितले.
नरसिंगच्या जागी दुस-या कुस्तीपटूला पाठवण्याची मुदत उलटून गेली आहे. नरसिंग ऑलिम्पिकची संधी हुकली तर भारताची आणखी एक पदकाची शक्यता कमी होईल असे सरण यांनी सांगितले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) साईच्या केंद्रात केलेल्या तपासात नरसिंगचे दोन नमुने पॉझिटीव्ह आढळले.
२५ जुलैला नरसिंग अन्य कुस्तीपटूंसोबत रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जॉर्जियाला रवाना होणारा होता. तेथूनच सर्व कुस्तीपटू थेट रिओला जाणार होते. पण भारतीय कुस्ती महासंघाने त्याला रोखले. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणा-या सुशीलकुमार बरोबर कायदेशीर लढाई लढून नरसिंग ऑलिम्पिकला जाणार होता.