सुहास खामकरचा पराक्रम, Pro Bodybuilding मध्ये मराठीचा ठसा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:12 PM2018-10-23T13:12:31+5:302018-10-23T13:28:42+5:30
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक... अशा अनेक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या बॉडी बिल्डर सुहास खामकरने Pro Bodybuilding मध्येही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक... अशा अनेक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या बॉडी बिल्डर सुहास खामकरने Pro Bodybuilding मध्येही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या Mr. Amateur Olympia स्पर्धेत सुहासने 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आणि त्याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा खिताब पटकावला. या कामगिरीसह त्याने Pro Card ही जिंकले. बॉडी बिल्डिंगमध्ये प्रो कार्ड मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
नॅशनल हेल्थ स्पोर्ट्स अँड फिटनेस फेस्टिवल (IHFF) यांच्यावतीने Mr. Amateur Olympia 2018 शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सुहासने 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. हे सुवर्ण पदक ऐतिहासिक ठरले, कारण चॅम्पियन ऑफ चॅम्पियनमध्ये बाजी मारताना त्याने प्रो कार्ड मिळवून देशाचा पहिला प्रोफेशनल बॉडी बिल्डर म्हणून होण्याचा मान पटकावला. त्यामुळे प्रो मिस्टर ऑलंपिया या स्पर्धेत भारतासाठी दार खुले करणारा सुहास हा पहिला खेळाडू ठरला.
या स्पर्धेत 70 देशातील 500 पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सुहास म्हणाला,''या विजयाचा आनंद आहेच. 2015 मध्ये मी विश्रांती घेतली होती. त्यावेळी मी फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. त्या दिशेने मी सरावाला लागलो. 2017 मध्ये मि. ऑलिम्पिया स्पर्धेत सहभागी झालो होतो, परंतु त्यावेळी प्रो कार्ड मिळवण्यात अपयशी ठरलो. मात्र, ती कसर आता भरून काढली. आता संपूर्ण लक्ष व्यावसायिक बॉडी बिल्डिंगवर केंद्रित करणार आहे.''
कोल्हापूरच्या सुहासने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जेतेपद जिंकली आहेत. वयाच्या 16 व्या वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास 37व्या वर्षीही अविरत सुरू आहे. सुहास पुढे म्हणाला,''कारकिर्दीत अनेक चढउतार आले. पण, त्यातून न खचता मी ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. व्यावसायिक बॉडी बिल्डिंग हे माझे पुढील लक्ष्य आहे. हे कार्ड त्यादिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणावं लागेल. जास्तीत जास्त व्यावसायिक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न आहे. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत मी या खेळात सहभाग घेत राहणार आहे.''
प्रो कार्ड मिळवल्यानंतर सुहास प्रचंड भावनिक झाला होता. पाहा हा व्हिडीओ...