दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीवर हिरवळ नसेल : क्युरेटर
By admin | Published: November 15, 2016 01:20 AM2016-11-15T01:20:00+5:302016-11-15T01:20:00+5:30
राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे.
विशाखापट्टणम : राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर अधिक हिरवळ राहणार नसल्याचे बीसीसीआयचे क्युरेटर कस्तुरी श्रीराम यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवसापासून येथे चेंडू वळतील, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल न ठरल्यामुळे भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला छाप पाडता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा आश्विनला लाभ मिळेल.
राजकोटप्रमाणे येथेही प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे. याच मैदानावर भारताने न्यूझीलंडला पाचव्या व अखेरच्या लढतीत ७९ धावांत गुंडाळून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने विजय मिळविला होता. एसीएचे सचिव व बीसीसीआयचे उपाध्यक्ष गोकाराजू गंगराजू यांनी सावध प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘‘आम्ही स्पोर्टिंग खेळपट्टी तयार केली आहे. यात उभय संघांना समान संधी असेल. आम्हाला निकालाची अपेक्षा आहे.’’ येथील खेळपट्टी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होती. राजस्थानने रणजी ट्रॉफी लढतीत दुसऱ्या डावात आसामचा ६९ धावांत धुव्वा उडवला होता. ही लढत तीन दिवसांमध्ये संपली होती.
गंगराजू म्हणाले, ‘‘कसोटी खेळपट्टीची तुलना रणजी सामन्याच्या खेळपट्टीशी करायला नको. आसामविरुद्धच्या लढतीतील खेळपट्टी वेगळी होती आणि संवाद नसल्यामुळे हे घडले होते.’’
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे लढतीबाबत ते म्हणाले, ‘‘भारत-न्यूझीलंड लढतीदरम्यान खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता; पण फलंदाजाच चुकीच्या पद्धतीने बाद झाले.’’
फिरकीला अनुकूल खेळपट्टी राहणार असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. कारण राजकोटमध्ये पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंनी
वर्चस्व गाजवून आपला निर्धार स्पष्ट केला आहे. मोईन अली, आदिल राशीद व जफर अन्सारी या
इंग्लंडच्या फिरकी त्रिकुटाने १३ बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)