मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची"
By admin | Published: July 13, 2017 06:34 AM2017-07-13T06:34:48+5:302017-07-13T07:26:36+5:30
फेसबुकवर मितालीला शुभेच्छा देताना विराटने मोठी चूक केली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.13 - भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. 8 विकेटने हा सामना भारताने गमावला असला तरी महिला क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा ओलांडणा-या मितालीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी मितालीला शुभेच्छा दिल्या. अन्य दिग्गज मंडळीप्रमाणे न्यूयॉर्कमध्ये गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत सुट्टी एन्जॉय करत असलेल्या भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही मितालीला ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण फेसबुकवर मितालीला शुभेच्छा देताना विराटने मोठी चूक केली. आपल्या पोस्टमध्ये त्याने शुभेच्छा तर मितालीलाच दिल्या पण त्यासोबत फोटो शेअर करताना त्याची भलतीच फसगत झाली. मितालीऐवजी त्याने कालच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मराठमोळ्या पूनम राऊतचा फोटो शेअर केला.
भारतीय महिला ‘टॉप’वर
मिताली राजने धावांचा एव्हरेस्ट पार केला, तर गोलंदाजी क्षेत्रात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. झुलन गोस्वामीच्या नावावर १८९ बळी आहे. तिने नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आॅस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्सपॅट्रिक हिचा १८० बळींचा विक्रम मोडला. योगायोग म्हणजे, पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्यामुळे क्रिकेटवरील भारतीय वर्चस्व स्पष्ट होते. ९ अर्धशतके एकाच वर्षात. गेल्या वर्षी इलीज पेरी हिने ९ अर्धशतके ठोकली होती. मितालीने या वर्षी १२ डावांत ७७.६२ च्या सरासरीने ६२१ धावा केल्या. ५ नाबाद शतकांचा समावेश. दहापैकी ९ सर्वाेच्च खेळींत तिने नाबाद खेळी केली.११४ धावांची पदार्पणात खेळी. आयर्लंडविरुद्ध १९९९ मध्ये ही कामगिरी. महिला क्रिकेटमध्ये पाच फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. पदार्पणात मितालीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाेच्च खेळी होती.१६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. ती सर्वांत तरुण फलंदाजी ठरली.१७ वर्षांखालील कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
>भारतीय क्रिकेटसाठी मोठा क्षण आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत जास्त धावा केल्या. अभिनंदन..
- विराट कोहली
सर्वोत्तम बातमी, मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली. अभिनंदन
- अनिल कुंबळे
मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू, सर्वोत्तम यश.
- अजिंक्य रहाणे
सर्वोत्तम यश, मिताली राज ही ६ हजार धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनली; तसेच सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली, दोन्ही विक्रम तिच्याच नावे.
- लिसा स्थळेकर
मिताली राज हिच्या खेळात होत असलेली प्रगती तिच्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून पाहत आहे. तिने आता सहा हजार धावा केल्या, अभिनंदन मिताली राज
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
अभिनंदन मिताली राज, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त धावा करण्याचा मान तू पटकावला. हे मोठे यश आहे. आजची खेळी सर्वोत्तम होती.
- सचिन तेंडुलकर
अभिनंदन मिताली राज, उल्लेखनीय पराक्रम, महिलाशक्ती.
- हरभजन सिंह
अभिनंदन मिताली राज, आम्हाला तुझा अभिमान आहे.
-शिखर धवन
अभिनंदन भारतीय रनमशिन, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त
धावा, टू चॅम्पियन. - गौतम गंभीर