गावखेड्याच्या मातीतले कल्पक स्कॉलर्स
By admin | Published: March 23, 2017 09:34 AM2017-03-23T09:34:56+5:302017-03-23T09:46:07+5:30
‘त्यांच्या’तलं कुणीही रूढार्थानं संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. गरीब कुटुंबातले.
‘त्यांच्या’तलं कुणीही रूढार्थानं संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. गरीब कुटुंबातले.
प्रयोगशाळेचं तोंडही त्यांनी कधी पाहिलं नाही; पण स्वत:च्या प्रश्नांवर त्यांनी जिवाचा आटापिटा करून स्वत: उत्तरं तर शोधलीच; पण त्या उत्तरांना उपकरणांचं रूपही दिलं. त्यांचं हेच संशोधन हजारो माणसांना आनंद आणि आशेचा आधार देऊ शकतात म्हणून महामहीम राष्ट्रपतींनीही
त्यांचा खास गौरव केला त्यांना भेटा...
हे सारेच तरुण खेड्यापाड्यातले.
देशाच्या कानाकोपऱ्यातले.
रूढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही, शास्त्रज्ञ नाही, तसलं कुठलं शिक्षणही कोणी घेतलेलं नाही, की रॉकेट सायन्ससारखं विज्ञानातलं मूलभूत संशोधनही त्यांनी केलेलं नाही.
तरीही ते संशोधक आहेत आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं आयुष्य बदलून टाकू शकेल असं काम त्यांनी केलं आहे. खरं तर ते स्वत: आपापल्या परिस्थितीशी झगडत होते. स्वत:च्या आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या, आपल्या प्रेमाच्या लोकांच्या आयुष्यात थोडासा ओलावा निर्माण करायचा प्रयत्न करीत होते.
हा प्रयत्न होता मात्र अत्यंत प्रामाणिक.
त्यांचं काम, त्यांचं संशोधन असं भव्यदिव्य नव्हतंच, पण त्यांच्या जिद्दीतून जे काही उभं राहिलं त्यानं मात्र सर्वसामान्यांचं जगणं आमूलाग्र बदलून गेलं. त्यांच्या डोळ्यांत पुन्हा स्वप्नं फुलली, जगण्याला आधार मिळाला आणि जगण्याच्या लढाईला बळही.
त्यातल्या काही निवडकांची या अंकात भेट.
ज्यांनी स्वत:बरोबरच अनेकांच्या आयुष्यात आनंद पसरवला.
खुद्द राष्ट्रपतींनीही त्यांच्या या प्रयत्नांचं मोल ओळखलं आणि राष्ट्रपती भवनात बोलवून या तरुणांचा सत्कार केला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचं नाव आहे ‘इनोव्हेशन स्कॉलर्स इन-रेसिडेन्स प्रोग्राम’.
सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी पडणारं, त्याचं आयुष्य बदलवून टाकणारं संशोधन ज्यांनी केलंय, असे दहा ‘संशोधक’ आणि दोन लेखक, कलावंतांना राष्ट्रपती स्वत: सन्मानित करतात. एवढंच नाही, देशाच्या प्रथम नागरिकाच्या घरी म्हणजेच राष्ट्रपती भवनात तब्बल १५ दिवस त्यांचा पाहुणचार होतो.
३ मार्च ते १८ मार्च या कालवधीत नुकताच या कलंदरांनी राष्ट्रपती भवनात शाही पाहुणचार घेतला, राष्ट्रपतींच्या शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली आणि त्यांच्या संशोधनाचं प्रदर्शनही थेट या शाही राजवाड्यात मांडलं गेलं. त्यासाऱ्यांना भेटायलाच हवं..
जमिनीखालचं ‘जीवन’
शेतकऱ्यांना जीवनदान देणारं ‘बोअरवेल स्कॅनर’!
गिरीश बद्रागोंड हा कर्नाटकच्या विजयपुरच्या शेतकऱ्याचा तरुण मुलगा. त्याच्या गावातही पाण्याची कायमच मारामार. आधीच गाव कोरडं. त्यात पवासाळी ढगांनीही कायम गावावरून पळ काढलेला. लोक कायम पाण्याच्या तलखीत. दहावीपर्यंत शिकलेल्या गिरीशनं नंतर इलेक्ट्रिशिअन म्हणून काम सुरू केलं, पण त्याच्याही डोक्यात कायम पाण्याचा विचार. पाऊसपाण्यानं नडलेला शेतकरी कायम इथे बोअरवेल खोदून बघ, तिथे खोदून बघ, इथेतरी पाणी मिळेल, तिथेतरी पाणी मिळेल म्हणून कायम आशेवर. गिरीशच्या डोक्यातही कायम एकच विचार, आपल्या गावाची पाण्याची चिंता कशी दूर करता येईल? असं एखादंही यंत्र, यंत्रणा असू नये जी ठामठोकपणे सांगू शकेल की इथे पाणी निघेलच... शेवटी गिरीशच कामाला लागला. त्यानं अभ्यास सुरू केला. अनेक प्रयोग करून पाहिले. भंगारबाजारातल्या वस्तू आणून जोडजाड करून पाहिली. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलंच. गिरीशनं असं एक उपकरण शोधून काढलं ज्यामुळे जमिनीत नेमकं कुठे पाणी आहे, हे तर कळतंच, पण त्या पाण्याचं प्रेशर नेमकं किती आहे, त्या ठिकाणचं तपमान किती आहे. जमिनीखाली पाण्याचा प्रवाह कसा, किती आहे, तिथे पाणी किती आहे, त्या पाण्याची आणि जमिनीची प्रत कशी आहे, त्या ठिकाणी बोअर खोदल्यावर प्रत्यक्ष जमिनीवर तुम्हाला किती पाणी मिळू शकेल, जमिनीच्या खाली आणि तिथून उपसल्यावर जमिनीच्या वर त्या पाण्याचा प्रवाह कसा असेल, जमिनीखाली ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच्या आजूबाजूची माती कशी आहे, खालची जमीन दगडाळ आहे का, या दगडांचे किती ब्लॉकेजेस तिथे आहेत, समजा, जमिनीखाली त्या ठिकाणी पाणी असलं तरीही शेतीसाठी ते तुम्हाला उपयुक्त आहे का.. यांसारख्या असंख्य गोष्टी ज्यातून समजू शकेल असं अत्यंत बहुउपयोगी यंत्र गिरीशनं विकसित केलं. हे कमी म्हणून की काय, ज्या जमिनीत ही बोअरवेल खोदायची आहे, तिथे कोणत्या प्रकारची पिके तुम्हाला घेता येतील याबाबतचा ‘फुकट’ सल्लाही गिरीश शेतकऱ्यांना देतो. स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं त्यांना काय काय अडचणी येतात, हे गिरीशला पक्कं आणि नेमकेपणानं ठाऊक होतं. जमिनीखालचं पाणी शोधणाऱ्या या स्कॅनरसाठी गिरीशनं त्याच्या उपकरणाला हाय डेफिनेशन कॅमेरे बसविले, डिजिटल कम्पास, टेम्परेचर आणि प्रेशर सेन्सर्सचा उपयोग केला, पाण्याचा फ्लो कसा आहे, पाणी असलेल्या ठिकाणी जमिनीची खोली किती आहे हे कळण्यासाठी डिटेक्टर्स वापरले. जीपीएसचा उपयोग केला. एवढंच नाही, ही सगळी माहिती स्क्रीनवर मिळण्यासाठी एलसीडी स्क्रीनचाही वापर केला. भूगर्भाच्या पोटातली ही जादू आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या गिरीशच्या या उपकरणाचं वजन आहे फक्त दीड किलो आणि जमिनीखाली तब्बल सहाशे फूट खाली पाण्याचं स्कॅनिंग हे उपकरण करू शकतं! गिरीशनं हे उपकरण तयार केलं, पण त्याआधी असं कुठलं बोअरवेल स्कॅनर उपलब्धच नव्हतं का? बाजारात आजही असे स्कॅनर उपलब्ध आहेत, पण एकतर ती आहेत खूप महागडी. शिवाय ती फक्त जमिनीखालची इमेज घेऊ शकतात. जमिनीखाली पाण्याचा स्रोत कसा आहे, पाण्याचा फ्लो कसा आहे याबाबतचे नेमकेपणानं विश्लेषण करण्याची क्षमता या स्कॅनर्समध्ये नाही. गिरीशला हे उपकरण तयार करण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च आला. मात्र या उपकरणाच्या मदतीनं ही सारी माहिती देण्यासाठी गिरीश आकारतो फक्त १५०० रुपये! गिरीशच्या या कामाचं मोल म्हणूनच मोठं आहे.
- समीर मराठे (समीर लोकमत वृत्तपत्रसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)sameer.marathe@lokmat.com