मोबाइल चोरीला गेला तर हुडकायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:00 AM2018-08-23T03:00:00+5:302018-08-23T03:00:00+5:30
मोबाइल चोरीला गेला तर तो ट्रॅक कसा करणार? त्याचा आयएमइआय नंबर तुम्हाला माहिती आहे का?
- प्रा. योगेश हांडगे
मोबाइल आपण जिवापाड जपतो. पण तरी तो हरवलाच तर? खरं तर मोबाइलच्या आयएमइआय (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेण्ट आयडेण्टिटी) क्र मांकामुळे वापरकर्त्याची ओळख पटण्यास मदत होते. तसेच वापरकर्त्याचा फोन ट्रॅक करणंही या 15 आयएमइआय क्र मांकामुळे शक्य होतं. परंतु अलीकडे या क्र मांकांत क्लोनिंगचे प्रकार आढळून आलेले होते. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या अशा हॅण्डसेटवर बंदी घालण्यात आली होती. दूरसंचार विभागाने नुकताच हा क्र मांक बदलण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमइआय क्र मांक तयार करण्याचा प्रयत्न केल्यास, दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. सरकारच्या या पुढाकारामुळे स्पर्धेतील मोबाइल कंपन्यांना न्याय मिळेल, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनचे म्हणणे आहे मोबाइल चोरीस गेला किंवा हरविला तर आयएमइआय क्र मांकावरून माग काढता येतो. ते सोपे होईल.
* मोबाइल चोरीबाबत चोरीची फिर्याद घेतल्यानंतर ‘आयएमइआय’ क्रमांकाच्या आधारे पोलीस तपास करतात. हा क्रमांक सध्या कोणत्या कंपनीच्या ‘सिमकार्ड’ वर वापरला जातो याचाच शोध घेतला जातो.
* मोबाइल वापरणा-याकडून कॉल केल्यानंतर तो कॉल संबंधित सेवा पुरवठादार कंपनीकडे नोंदवला जातो. या नोंदणीत मोबाइलचा आयएमइआय क्र मांक दिसतो. मोबाइल क्र मांक त्यातील सिमकार्ड बदलून नवा घेता येतो. मात्न आयएमइआय क्रमांक बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान व विशेष प्रणाली आवश्यक असते. आयएमइआय क्र मांक जागतिक स्तरावरील जीएसएमए ही संस्था देते. मोबाइल हरवल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी वापरकर्त्याने आयएमइआय क्र मांक देणं गरजेचं आहे.
* कसा माहीत करून घ्यावा आयएमइआय नंबर. तुम्ही जेव्हा नवीन मोबाइल खरेदी कराल त्यावेळी मोबाइलचा आयएमइआय नंबर माहिती करून घ्या. माहीत नसेल तर *06 असे डायल करा आणि जाणून घ्या आयएमइआय नंबर.
* आता मोबाइलचा शोध घेण्यासाठी ब-याचशा संकेतस्थळावर मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ती सॉफ्टवेअर मोबाइलवर डाउनलोड करून मोबाइल हरवला किंवा चोरी झाला की हे सॉफ्टवेअर तुम्हाला नेमके ठिकाण (लोकेशन) दाखवेल. ते तुमच्या मोबाइल आयएमइआय (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेण्ट आयडेण्टीफाय) नंबरवर आधारित असतं.
* अनेकदा मोबाइल दुरुस्ती करणारे मेकॅनिक या क्रमांकाशी छेडछाड करतात. कधी अज्ञानानेही करतात. ते होणंही गुन्हा आहे.
* चोरीचे मोबाइल व विविध गुन्ह्यांत वापरलेल्या मोबाइलचे आयएमइआय नंबर बदलून मोबाइल अन्य व्यक्तीला विकले जातात. त्यामुळे पोलिसांच्या सायबर पथकाला ते मोबाइल वापरणा-या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येत नाही.
* त्यामुळेच आता नवीन नियम करण्यात आला आहे. ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेण्ट आयडेण्टिफिकेशन नंबर रुल्स, 2017’ केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधिसूचनेनुसार हा नवा नियम सरकारने तयार केला आहे. नव्या नियमाला छेडछाड विरोधक नियम 2017 असं नाव देण्यात आलं आहे.
* या नियमानुसार आयएमइआय क्रमांकात फेरफार करणा-यास तसेच असा मोबाइल वापरणा-यास आता शिक्षा होणार आहे. याशिवाय आयएमइआय क्रमांकात फेरफार करणारी संगणक प्रणाली तयार करणाराही शिक्षेस पात्र ठरेल.
* त्यामुळे आपण काळजी घेणं आणि या अर्थानंही टेकसॅव्ही होणं गरजेचं आहे.
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )